अधिवक्ता परिषद मालवण यांच्या वतीने अधिवक्ता सोनल पालव व अधिवक्ता ऐश्वर्य मांजरेकर यांचा सत्कार
चौके (प्रतिनिधी) : अधिवक्ता परिषद मालवण तालुका यांचे वतीने गुरुवार दि.०१ जानेवारी २०२६ रोजी मालवण न्यायालयातील वकील कक्षामध्ये विशेष गुणसंपन्न व प्राविण्य प्राप्त अधिवक्ता सोनल पालव व अधिवक्ता ऐश्वर्य मांजरेकर यांचा सत्कार करण्यात आला. नववर्षाचे औचित्य साधून अधिवक्ता परिषद मालवण च्या वतीने दोन्ही सत्कार मूर्तींचे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. अधिवक्ता सोनल पालव यांनी ४२ किलोमीटर मॅरेथॉन अवघ्या सहा तासांच्या आत पार करत मालवण बार असोसिएशनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. तसेच अधिवक्ता ऐश्वर्य मांजरेकर यांनी समाजसेवेचा वसा घेत समाजसेवा हीच ईश्वरसेवा समजत आपल्या समाजकार्यातून आपला ठसा उमटवत थेट स्वतंत्र कोकणराज्य अभियान मार्फत देण्यात येणाऱ्या कोकण भूषण या पुरस्काराला गवसणी घातली आणि मालवण वकिल संघाला आनंद व्यक्त करण्याची संधी प्राप्त करुन दिली. अधिवक्ता ऐश्वर्य मांजरेकर यांनी यापूर्वी १५ पेक्षा जास्त सामाजिक कार्याप्रती देण्यात येणारे पुरस्कार प्राप्त केले असून या दोन्ही अधिवक्त्यांच्या सत्कार आणि कौतुक सोहळ्याने नववर्षाची सुरुवात झाली. यावेळी ऐश्वर्य मांजरेकर याचा सत्कार ज्येष्ठ अधिवक्ता गिरीश गिरकर यांचे शुभहस्ते आणि सोनल पालव यांचा सत्कार अधिवक्तामाधवी बांदेकर यांचे शुभहस्ते, शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. त्यानंतर ज्येष्ठ अधिवक्ता माधवी बांदेकर आणि ज्येष्ठ अधिवक्ता समीर गवाणकर यांनी सत्कारमूर्तींचे कौतुक केले.
अधिवक्ता सौ. पालव यांनी आपल्याला मिळालेल्या यशा मागील त्यांचे कष्ट आणि मेहनत याची विस्तृतपणे माहिती उपस्थितांना दिली आणि सर्वांना धावण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच सत्कार मूर्ती अधिवक्ता ऐश्वर्य यांनी आपल्या समाजसेवेची माहिती देत उपस्थितांमध्ये समाजसेवेची भावना अधिक दृढ करत मनोगत व्यक्त केले. या सत्कार समारंभाचे मान्यवर, सत्कार मूर्तींचा परिचय व सुत्रसंचालन अधिवक्ता प्रथमेश सामंत यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत आपल्या विशिष्ट भाषाशैली मध्ये अधिवक्ता एस. व्ही. प्रभुखानोलकर यांनी केले. त्यानंतर या समारंभात उपस्थित असलेले जेष्ठ अधिवक्ता. माधवी बांदेकर व अधिवक्ता समीर गवाणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून सत्कार मूर्तींचे अतिशय सुंदरपणे कौतुक केले आणि नवोदित व सर्व ज्युनियर वकिलांना प्रोत्साहित केले. अधिवक्ता परिषदेचे मालवण तालुका अध्यक्ष अधिवक्ता प्रदीप मिठबावकर यांनी सत्कार समारंभात उपस्थित असणाऱ्या सर्व अधिवक्तांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी अधिवक्ता गिरीश गिरकर, अधिवक्ता समीर गवाणकर, अधिवक्ता हेमेंद्र गोवेकर, अधिवक्ता मिलिंद सुकाळी, अधिवक्ता दिलीप ठाकूर, अधिवक्ता स्वरूप पई, अधिवक्ता एस. व्ही. प्रभूखानोलकर, अधिवक्ता अविनाश पाटकर, अधिवक्ता अमित पालव, अधिवक्ता अमेय कुलकर्णी, अधिवक्ता दिपेश नार्वेकर,अधिवक्ता माधवी बांदेकर, अधिवक्ता निवेदिता मयेकर, अधिवक्ता सोनाली कुबल, अधिवक्ता मानसी चव्हाण, अधिवक्ता प्राची कुलकर्णी, अधिवक्ता पूजा शेडगे, अधिवक्ता प्राजक्ता गांवकर, अधिवक्ता काजल झाड, अधिवक्ता प्रिती पवार, अधिवक्ता रुचिता कुमठेकर आदि. यांचे मोलाचे सहकार्य लाभले.












