कासार्डे माध्य-व उच्च माध्यमिक विद्यालयाचा १९ वर्षांखालील मुलांचा संघाची बाजी: कोल्हापूर विभागात अव्वल

शालेय राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या 19 वर्षाखालील व १७ वर्षाखालील मुला- मुलींनी शालेय कोल्हापूर विभागीय आट्यापाट्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून 19 वर्षाखालील मुलांच्या संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकवून कासार्डे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात मानाचा तुरा लावला आहे. १७ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर महानगरपालिका, सांगली महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या ८ जिल्ह्यांतील प्रथम क्रमांक प्राप्त संघातून कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या प्रशालेच्या एकाच वेळी तब्बल तीन संघाने कोल्हापूर विभागस्तरावर यश संपादन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

विजेता १९ वर्षांखालील मुलांचा संघ फेब्रुवारी त धाराशिव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेत कोल्हापूर विभागीचे नेतृत्व करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडाक्षेत्राला ही अभिमानाची बाब आहे.
दरम्यान विभागीय स्पर्धेत या संघाने उपांत्य फेरीत गतविजेत्या बलाढ्य कोल्हापूर संघाला विविध कौशल्याने चितकरून अंतिम फेरीत धडक मारली. तर अंतिम लढत सांगली जिल्हा संघाबरोबर खेळताना कासार्डे संघाने अष्टपैलू खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत एकतर्फे विजय संपादन करून सिंधुदुर्ग जिल्हाचे नाव अभिमानाने उंचावले.

यशस्वी खेळाडू आणि अष्टपैलू कामगिरी…

या यशस्वी १९ वर्षांखालील मुलांच्या संघाचा कर्णधार भुपेश सुतार याने उत्तम कामगिरी पार पाडली याशिवाय संघातील इतर खेळाडू दुर्वेश गोसावी, मयुरेश नारकर, अजय पवार, दुर्वास पवार, निहार तांबे, यश रहाटे, सार्थक गुरव, अथर्व अतूल सावंत, आकाश वळंजू, साहिल शेट्ये, अथर्व सत्यविजय सावंत यांची त्याला उत्कृष्ट साथ मिळाली.

कासार्डे विद्यालयाच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने रत्नागिरी संघाचा सहज पराभव करुन उपांत्य फेरीत धडक मारली पण, गतविजेत्या सातारा संघाकडून त्यांना हार मानावी लागली. तर १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने इचलकरंजी महानगरपालिका संघाला सहज नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला पण, कोल्हापूर मनपा संघाच्या उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध पद्धतीने खेळणा-या संघाकडून त्यांना हार पत्करावी लागल्याने या दोन्ही संघांना ब्रॉंन्झ पदकावरच समाधान मानावे लागले. १७ वर्षांखालील मुलांच्या संघात कर्णधार दत्तराज केसरकर, नितेश गावडे, अनिकेत पवार, निखिल पन्हाळकर, स्वराज साळसकर, शुभम राठोड, मयुर साटम,निर्भय बाणे, कुंवर रोगये,जय गुरव, वेदांत चव्हाण, चंदन पाताडे आदी खेळाडूंचा तर मुलींच्या संघात कर्णधार कु.भक्ती लाड, कु.गार्गी पाताडे, कु.पुर्वा आईर, सलोनी पाताडे, कु.रिध्दी राणे, कु.शिवानी जाधव, कु.तन्वी जाधव, कु.समृद्धी कदम, कु.स्वरा मोहिते, कु.काव्यांजली देवरुखकर, कु.संस्कृती घाडी आदी खेळाडूंचा समावेश होता.

या यशस्वी संघांना कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा आट्यापट्या खेळाचे मुख्य प्रशिक्षक दत्तात्रय मारकड, संघ व्यवस्थापक तथा मार्गदर्शक देवेंद्र देवरुखकर, यशवंत परब, एच.डी. शेलार, पूजा पाताडे, वैष्णवी डंबे, देवांशी कुडतरकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तर संघाला विनायक पाताडे, नवनाथ कानकेकर, दिवाकर पवार, अनिल जमदाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कासार्डे शिक्षण संस्थेमार्फत खेळाडूंचा सत्कार व शुभेच्छा…

खेळाडूंच्या या उज्ज्वल यशाबद्दल कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार, सरचिटणीस रोहिदास नकाशे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे पुष्पहार देऊन अभिनंदन करीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, संस्था पदाधिकारी रविंद्र सिताराम पाताडे, लक्ष्मण पाताडे, रविंद्र गणपत पाताडे, दिलीप शेलार, दिपक गायकवाड, सचिन वंजारे, प्राचार्या बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे, क्रीडा शिक्षक आणि संघ व्यवस्थापक उपस्थित होते.

या तीनही संघाचे विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधी, पालक शिक्षकसंघ, ग्रामस्थ, कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघानेही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. या संघाचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!