सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र पोलीस दलाकडून 65वा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन दि. 02 जानेवारी, 2026 रोजी साजरा करण्यात आला. सदर वर्धापन दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून कायदा व सुव्यवस्था, नागरीकांचं संरक्षण आणि संविधाननिष्ठ कर्तव्यपालन, महिलांचा सन्मान या मुल्यांना सर्वोच्च स्थान देण्याचा संकल्प दृढ करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस वर्धापन दिन हर्ष परेड प्रथमच डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या संकल्पनेतुन आयोजित करण्यात आलेली होती. या परेडच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस दलाची शिस्त, एकात्मता व कर्तव्यनिष्ठा यांचे दिमाखात सादरीकरण करण्यात आले.
सदर महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन परेड समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर देशपांडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, सिंधुदुर्ग हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात पोलीस हा केवळ गणवेश नसून तो जबाबदारीचा, विश्वासाचा आणि धैर्याचा प्रतिक असून स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य न देता नागरीकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे पोलीस हेच आपल्या सेवेचे खरे स्वरुप असल्याचे तसेच आज गुन्हेगारीचे स्वरूप पूर्णतः बदलत असून सायबर गुन्हे, आर्थिक फसवणुक, संघटीत गुन्हेगारी यासारख्या नव्या आव्हानांना सामोरे जाताना तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी मानवी संवेदना, नैतीक मुल्ये आणि कायद्यावरील निष्ठा या गोष्टी कधीही बदलू नयेत यासाठी कायम प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा आपल्याला अभिमान वाटत असून त्यांच्या परिश्रमांमुळे समाजात शांतता व कायद्याचा आदर टिकून असून पोलीस दलावरील विश्वास हिच आपली ताकद आहे, असे म्हणून पोलीस दलाच्या उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. परेड संपल्यानंतर उपस्थित नागरीक व विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन घडवून माहिती देण्यात आली. यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र वर्धापन दिनाचे निमित्ताने प्रमुख पाहुणे सुधीर देशपांडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, सिंधुदुर्ग यांच्यासह डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, नयोमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, श्वेता खाडे, पोलीस उपअधीक्षक (मुख्या.), घनश्याम आढाव, उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली तसेच इतर पोलीस अधिकारी, अंमलदार, नागरीक व नाग्या महादू कातकरी वस्तीगृह शाळा, वेताळबांबार्डे, ता. कुडाळ व न्यु इंग्लिश स्कुल, ओरोस सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ या शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. परेडचे नेतृत्व रामदास पालशेतकर, राखीव पोलीस निरीक्षक व निशान टोळीचे नेतृत्व सुरज पाटील, पोलीस उपनिरीक्षक यांनी पाहिले.













