फोंडाघाट (प्रतिनिधी) : येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे सावित्रीबाई फुले महिला विकास कक्षाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. विनोदसिंह पाटील म्हणाले की, जगभरातील अनेक देशांमध्ये जाती, धर्म आणि वंशाच्या आधारावर स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत स्त्रीमुक्तीच्या लढ्याचे विधाते आणि स्त्री-पुरुष समतेचे जनक म्हणून फुले दांपत्याचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कार्य करताना सावित्रीबाई फुले यांनी अपमान, उपेक्षा आणि अनेक संकटांना सामोरे जाऊन शिक्षणाचा दिवा पेटवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले की, आज महिलांनी राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली आहे, याचे संपूर्ण श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या दूरदृष्टीला जाते. सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांसाठी समानतेचे दरवाजे खुले केले. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य समजून घेऊन ते केवळ पुस्तकापुरते न ठेवता प्रत्यक्ष आचरणात आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जगदीश राणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ. विद्या मोदी यांनी केले, तर आभार प्रा. डॉ बालाजी सुरवसे यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












