पर्यावरण चळवळीचा आधारस्तंभ हरपला!

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधवराव गाडगीळ यांचे निधन

पुणे (प्रतिनिधी) : पर्यावरणशास्त्र, जैवविविधता संवर्धन आणि लोकसहभागी विकासाच्या विचारांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणारे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, प्राध्यापक माधवराव गाडगीळ यांचे बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ८३ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय पर्यावरण चळवळीला तसेच शैक्षणिक व संशोधन क्षेत्राला मोठी हानी झाली आहे. प्राध्यापक गाडगीळ यांच्या पश्चात मुलगी, मुलगा, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीचे गेल्या वर्षी निधन झाले होते.

२४ मे १९४२ रोजी पुणे जिल्ह्यात जन्मलेल्या माधवराव गाडगीळ यांनी शालेय शिक्षण पुण्यातील मॉडर्न विद्यालयातून पूर्ण केले. पदवी शिक्षण पुणे विद्यापीठातून तर पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९७० च्या दशकात हार्वर्ड विद्यापीठातून Mathematical Ecology या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली. एका जीवशास्त्र विद्यार्थ्याला या विषयात प्रथमच अशी पदवी देण्याचा मान हार्वर्ड विद्यापीठाने त्यांना दिला होता.

भारतामध्ये परतल्यानंतर प्रा. गाडगीळ हे Indian Institute of Science (IISc), बेंगळुरू येथे रुजू झाले. १९७३ ते २००४ या कालावधीत त्यांनी पर्यावरणशास्त्र क्षेत्रात भरीव व दूरगामी काम केले. १९८३ साली त्यांच्या नेतृत्वाखाली Center for Ecological Sciences ची स्थापना करण्यात आली. Evolution, Ecology, Conservation Biology, Human Ecology आणि Ecological History या विषयांवर त्यांनी संशोधन करताना २२५ हून अधिक शास्त्रीय लेख प्रकाशित केले.

पश्चिम घाट (सह्याद्री) परिसरात स्थानिक समाजाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी जवळपास चार दशके सातत्याने कार्य केले. तसेच ईशान्य भारतातील जैवविविधतेचा अभ्यासही त्यांनी स्थानिक समुदायांच्या सहभागातून केला. भारतातील पहिल्या Biosphere Reserve प्रकल्प प्रस्तावाच्या मांडणीमध्ये १९८६ साली त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. Biological Diversity Act 2002 आणि Forest Rights Act 2006 यांसारख्या महत्त्वाच्या कायद्यांच्या निर्मितीतही त्यांचे मोलाचे योगदान राहिले.

प्रा. गाडगीळ यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच भारत सरकारने त्यांना पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले होते. २००९ साली स्थापन झालेल्या पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी लोकसहभागातून जैवविविधता संवर्धन कसे साधता येईल याबाबत मूलगामी मार्गदर्शन केले.

अनेक पुस्तकांचे लेखक, संशोधक, पर्यावरण कार्यकर्ते आणि स्थानिक समाजासाठी प्रेरणास्थान असलेले प्रा. माधवराव गाडगीळ आज आपल्यातून निघून गेले असले तरी, त्यांचा विचार व कार्य पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरणार आहे.

error: Content is protected !!