कणकवली (प्रतिनिधी) : बांधकरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली होती. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन आज सकाळी तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे रविवारची सुट्टी असूनही नगरपंचायतीचे कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढाकार घेत या कामात सक्रिय सहभाग नोंदवला.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले, तरी तेजस राणे व सुमित राणे यांनी जनतेशी असलेली नाळ कायम ठेवत बांधकरवाडीतील नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. “निवडणुकीचा निकाल काहीही असो, जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत,” अशी भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली. त्यांच्या या तत्पर आणि सामाजिक जाणिवेच्या भूमिकेचे परिसरात नागरिकांकडून कौतुक होत आहे.
स्वच्छता मोहिमेदरम्यान गटारांमध्ये साचलेला कचरा व गाळ काढून पाण्याचा निचरा सुरळीत करण्यात आला. या वेळी नगरपंचायतीचे ध्वजा उचले, मनोज धुमाळे, भिवा परब, बंडू कलिंगन, सत्यवान राणे, मंगेश घाडीगावकर, किशोर उबाळे, मेघन मुरकर यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












