२१ वे जागतिक मराठी संमेलन गोवा येथे संपन्न
संदिप परब यांच्या माणूसकीच्या कार्याचा गोव्यातील जागतिक मराठी संमेलनात डंका
खारेपाटण (प्रतिनिधी) : “रस्त्यावरील निराधार वंचित वयोवृद्ध, जखमी, आजारी बांधवांना शासकीय रुग्णालयात उपचार मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. निराधार जखमी रूग्णांना हात लावायला कोणी तयार नसायचे. रस्त्यावरच्या या बेघर निराधार वंचित बांधवांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि म्हणून या बांधवांना माणुसकीचे जीवन मिळवून देण्यासाठी आश्रम सुरू करावे लागले, असे भावपूर्ण उद्गार जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या जागतिक मराठी संमेलनातील ‘शोध मराठी मनाचा आधारवड’ या सत्रातील मुलाखती दरम्यान काढले.
जागतिक मराठी अकादमी आणि गोवा राज्य आयोजन समितीने आयोजित केलेल्या या २१ व्या जागतिक मराठी संमेलनात ‘शोध मराठी मनाचा आधारवड’ या मुलाखतीच्या सत्रात जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब, रानमाणूस प्रसाद गावडे, कमलाकांत तारी यांच्या सहभागातील मुलाखतीचे सत्र संपन्न झाले होते. यावेळी ते बोलत होते.

मुंबई नगरीत हाती कोणतीही संसाधने नसताना सर्वसामान्य कुटुंबातील संदिप परब यांच्यासारख्या एका गिरणी कामगाराच्या मुलाने मुंबई, ठाणे पालघर, सिंधुदुर्गसह गोवा राज्यातील रस्त्यावरील निराधार वंचित वयोवृद्ध, आजारी, जखमी, मनोरुग्ण बांधवांसाठी आधारवड ठरलेल्या जीवन आनंद संस्थेच्या कार्याची सुरुवात मुंबई सांताक्रूझ येथील वाकोला पुलाखाली केली व असंख्य निराधारांना आज मायेचा आधार दिला आहे. रस्त्यावरील निराधार वंचितांसाठीच्या सेवाशुश्रूषा कार्यात सुरुवातीच्या काळात आलेल्या अनुभवांवर आधारित जागतिक मराठी संमेलनात आपले मनोगत मांडताना संदिप परब यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी गोवा राज्य अकादमीच्या वतीने संदीप परब यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.












