अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची धडक कारवाई

मिटक्याचीवाडी येथे १०७ झाडांची तोड; पाच जणांना अटक, साहित्य जप्त

कुडाळ (प्रतिनिधी) : नेरुर ता. हवेली अंतर्गत मौजे मिटक्याचीवाडी येथील निर्णित वनसर्वे क्रमांक ९४/१ मध्ये झालेल्या अवैध वृक्षतोडीवर वनविभागाने धडक कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत वृक्षतोडीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले असून शासनाचे सुमारे ६२ हजार २६६ रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वनपाल नेरुर ता. हवेली व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी संबंधित वनक्षेत्रात तपासणी केली. यावेळी प्रकाश शंकर तावडे (रा. मिटक्याचीवाडी, ता. कुडाळ) याच्यासह त्याचे मजूर कार्तिक रामा नाईक, संदिप विष्णू नाईक, रामा सिध्दा नाईक व तुकाराम गोविंद नाईक (सर्व रा. चौकुळ–केगदवाडी, ता. सावंतवाडी) हे अवैधरित्या वृक्षतोड करताना आढळून आले.

या प्रकरणात आरोपींकडून पाळ कोयता (१), हात कोयते (२) व लाकूड कटर मशिन (२) असे साहित्य ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले. वनरक्षक नेरुर ता. हवेली यांनी प्रथम रिपोर्ट क्रमांक ०१/२०२६ नुसार गुन्हा नोंदविला असून, पुढील तपासाकरिता गुन्हा क्रमांक सी ०१/२०२६ देण्यात आला आहे.

आरोपी क्रमांक १ ते ५ यांनी संबंधित वनक्षेत्रात अनधिकृत प्रवेश करून १०७ झाडांची तोड करून त्यापासून इमारती व जळावू लाकूड माल तयार केल्याची कबुली दिली. त्यानुसार पंचासमक्ष त्यांना अटक करण्यात आली. आरोपींना कुडाळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे.

या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री. संदिप कुंभार यांनी सांगितले की, शासकीय वनात अनधिकृत प्रवेश, अवैध वृक्षतोड व लाकूड वाहतूक हे भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हे असून, त्यासाठी दोन वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक (प्रा.) सावंतवाडी मिलिश दत्त शर्मा व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संदिप कुंभार, वनपाल सुर्यकांत सावंत (नेरुर ता. हवेली), सावळा कांबळे (मठ), वनरक्षक सचिन पाटील, प्रसाद पाटील तसेच वनमजूर यशवंत कदम यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडली.

error: Content is protected !!