छत्रपती शिवरायांच्या किल्ले संवर्धन, प्रचार आणि प्रसारासाठी धावणारी अस्मा भारतातील पहिली महिला

शासन आणि ग्रामस्थांकडून अस्माचे कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या बावडा या ग्रामीण भागातून, एका जाज्वल्य ध्येयाने प्रेरित होऊन, जनसामान्यांना छ. शिवाजी-संभाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा सन्मान राखण्यासाठी धावणारी अस्मा कुराणे हिचे कोकणचे प्रवेशद्वार फोंडाघाट रेस्ट हाऊस वर रात्री उशिरा आगमन झाले. ती येणार याची फ्युचर फिट जिमचे संचालक अमित कदम यांनी खबर दिली. नंतर शिवप्रेमी ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांनी अस्माचे हार्दिक स्वागत केले. यावेळी फोंडाघाटचे सर्कल प्रवीण मोंडे, तलाठी समृद्धी गवस, समुदाय आरोग्य अधिकारी अमोल केंद्रे, कोतवाल पांडुरंग राणे यांनी शासनातर्फे अस्माचे पुष्पहार घालून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. फोंडाघाटवासीयातर्फे राजा शिरोडकर, ध्रुव गोसावी, राजेंद्र मोरये, अनिल मोरये, स्वप्निल गवळी, भाई तेली, बाळा पावसकर, हर्षद सावंत, कुमार नाडकर्णी इत्यादी शिवप्रेमी यांनी स्वागत, सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सिंधुदुर्गाच्या प्रवेशद्वारावरील शिवप्रेमी फोंडावासीयांनी, एवढ्या उत्साहात केलेल्या स्वागताबद्दल, अस्माने कोकण मधील आदरातित्याची झलक पहावयास मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. युनोस्कोच्या यादीत सिंधुदुर्गातील दोन किल्ल्यांचा झालेला समावेश हा जिल्हा करिता अभिमानास्पद बाब आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक, पर्यटनदृष्ट्या प्रसार आणि प्रचार, महिलांमध्ये आरोग्य क्रीडा आणि धाडसाची प्रेरणा निर्माण करणे यासाठी ही दौड आहे. युवकांमध्ये इतिहास जतन आणि किल्ले संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी, प्रत्येक किल्ला शृंखलेत जोडताना, सुमारे ६० दिवसात ३४७० किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण करण्याचा मानस आहे. यासाठी कोल्हापूरचे आम. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मार्गावरील संबंधित जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, स्थानिक व प्रशासकीय सहकार्यासाठी विनंती केली आहे. सोबत सहकारी शुभम पाटील, रोहित बगाडी, मयुरेश पाटील आणि ॲम्बुलन्स चालक यांची समर्थ साथ मिळत आहे.
मी मुस्लिम असल्यामुळे, माझ्या या ध्येयाला घरातून, मित्रपरिवारातून किंबहुना समाजातून सुरुवातीला खूप विरोध झाला. परंतु कोल्हापूर ते रायगड आणि पुरंदर ते कोल्हापूर असा प्रत्येकी ३०० किमीचे अंतर चार दिवसात धावून पूर्ण केल्यावर, आत्मविश्वास निर्माण झाला. माझे मित्र आणि घरच्यांचा विरोध मावळला. त्यांनी प्रोत्साहन दिले. कोल्हापूरच्या राजघराणे यांनी ऊर्जा दिली. मग युनोस्कोच्या यादीत समाविष्ट, जागतिक वारसा लाभलेल्या १२ किल्ल्यांची माळ ओवण्याचे ध्येय खुणावू लागले. धावपटू सोफिया खान ही माझी आयडॉल आहे. हा उपक्रम करणारी भारतातील मी पहिली महिला असल्याचा अभिमान वाटतो, असे तिने आत्मविश्वासाने सांगितले.
मात्र फोंडाघाट मधील अनेक शिवप्रेमी यावेळी उपस्थित नव्हते. पुढच्या प्रवासास शुभेच्छा देताना फोंडावासीयांनी एका थरारक युवतीच्या ध्येयाला अस्मा आणि तिच्या साथीदारांना सलाम केला. रात्री विसावा घेऊन दुसऱ्या दिवशी पहाटे त्या पुढील प्रवासास निघाल्या.












