रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम मार्फत सुरू जीवनदान महाकुंभ २०२६ मध्ये फोंडाघाट येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन
फोंडाघाट (प्रतिनिधी) : स्व. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथे नुकतेच एस. एस. पी. एम. वैद्य. कॉलेजच्या सहकार्यातून, फोंडाघाट मध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि वंदन करून रक्तदाते संभाजी पाचंगे व अथर्व बगाडे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष नितीन कोंडविलकर यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले. दान अनेक आहेत, पुण्य अनेक आहेत, परंतु जेव्हा ते जीवन वाचवते तेव्हा ते सर्वश्रेष्ठ पुण्य ठरते. रक्तदान म्हणजेच प्रत्यक्ष ईश्वरसेवा! आणि ही ईश्वरसेवा जगद्गुरूंच्या प्रेरणेने होते, तेव्हा त्याचे लाभ अमूल्य असते. दरवर्षी पंधरा दिवस चालणाऱ्या जीवनदान महाकुंभ २०२६ मध्ये कणकवली तालुका आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कणकवली तालुका पिठाचे शशांक एकावडे, एकता सावंत, निधी कोंडविलकर, विघ्नेश चव्हाण, अशोक माने, अशोक जगताप, शरद पाडावे, सुचिता शिरोडकर, विनायक सावंत, समिता चव्हाण, पूजा देसाई इत्यादी शिष्यगण उपस्थित होते.
एस. एस. पी. एम. वैद्यकीय महाविद्यालयाचे अमृता आचरेकर, अक्षता केळकर, वनिता जंगले, नागेश जाधव, सौरभ फाटणगावे, विनय पवार, अनघा वाघोटे इ. नी रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदान करून घेतले. स्व. मराठे कृषी महाविद्यालयाकडून यथोचित सहकार्य करण्यात आले. या शिबिरात हिमोग्लोबिन तपासणी ३७ आणि रक्तदाते २१ यांची नोंद झाली. तालुका पिठाकडून अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. शेवटी तालुका महिला अध्यक्ष, एकता सावंत यांनी आभार मानले. थोडक्या कालावधीत आणि प्रतिकुल परिस्थितीत आयोजित या रक्तदान महाकुंभास चांगला प्रतिसाद मिळाला.












