वैभववाडी (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये वैभववाडी तालुक्याच्या सुपुत्रांनी उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. विविध राजकीय पक्षांतून निवडून आलेल्या या सहा नगरसेवकांनी वैभववाडी तालुक्याच्या राजकीय सामर्थ्याची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेत ठाणे जिल्ह्यातील तिथवली गावचे सुपुत्र किरण तावडे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयामुळे शिवसेना (उबाठा) गटात उत्साहाचे वातावरण आहे.तसेच एडगाव गावचे सुपुत्र संजय पवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणूक लढवून यश संपादन केले आहे. त्यांच्या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
लोरे गावचे अजित रावराणे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून निवडून आले असून त्यांनी मतदारांचा विश्वास सार्थ ठरविला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेतून करूळ गावच्या स्वाती गुरखे या भाजपकडून विजयी झाल्या असून महिलांचे प्रतिनिधित्व अधिक बळकट झाले आहे.
तसेच नापणे गावचे शेखर यादव हे शिंदे गटाच्या शिवसेनेतून विजयी झाले आहेत.
या सर्व नगरसेवकांच्या यशामुळे वैभववाडी तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विविध गावांमध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तालुक्यातील जनतेला आता या लोकप्रतिनिधींमार्फत मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












