फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट परिसरातील विविध ठिकाणच्या श्री गणेश मंदिरात माघी श्री गणेश जयंती उत्सवाचे नियोजन गुरुवार तारीख २२ जानेवारी, २०२६ रोजी करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक ठिकाणी सकाळी पूजाअर्चा, अभिषेक, दुपारी बारा वाजता गणेश जन्मोत्सव, दुपारी महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
फोंडाघाट बाजारपेठ
फोंडाघाट बाजारपेठेतील श्री देव राधाकृष्ण मंदिर वैश्य समाजाच्या मंदिरामध्ये, गणेश जन्मोत्सव दुपारी बारा वाजता, गोखले गुरुजी यांच्या सुश्राव्य कीर्तनाच्या सानिध्यात अबाल वृद्ध महिला पुरुषांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. त्यानंतर महाआरती आणि तीर्थप्रसाराचे वाटप संपन्न होणार आहे.
श्री शृंगेश्वर गणपती मंदिर दळवीवाडी- वडण
निसर्गाच्या सानिध्यात शिंगोबा डोंगराच्या पायथ्याशी परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या पुनीत आराधनेतून साकारलेल्या या शृंगेश्वर गणपती मंदिरात गणेश जन्माबरोबर श्री सत्यविनायक महापूजा आयोजित केली आहे. त्यानंतर दिवसभर केळोबा प्रासादिक भजन मंडळ- फोंडाघाट, लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ- जाणवली, रवळनाथ प्रासादिक महिला दिंडी भजन मंडळ- पडवे, ब्राह्मणदेव महिला मंडळ- देवगड,रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ- फोंडाघाट, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ – आचिर्णे, स्व. शांताराम दादा स्मृती भजन मंडळ करंजे, सुश्राव्य भजन भजने आयोजित करण्यात आली आहेत. महिलांसाठी दुपारी दोन ते सहा हळदीकुंकू व रात्री दहा वाजता नाईक मोचेमाडकर दशावतारी लोकनाट्य मंडळ वेंगुर्ला यांचे ‘निल माधव’ हे दशावतारी नाटक होणार आहे.
श्री गणेश मंदिर, घोणसरी
परिसरातील कित्येक भाविकांचे श्रद्धास्थान आराध्य, घोणसरी गणेश मंदिरात विविध अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी पूजाअर्चा, अभिषेक, दुपारी जन्मोत्सव, महाआरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद स्थानिक भजने आणि रात्री स्थानिक कलाकारांचे धमाल कौटुंबिक कॉमेडी ‘सुनबाई तोऱ्यात’ नाटक होणार आहे.
गडगेसकल गणेश मंदिर
गोसावी वाडीतील आणि डोंगरदरांच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या या मंदिरामध्ये, स्थानिक मंडळाची भजने महाप्रसाद हळदी कुंकू, सुश्राव्य कीर्तन आणि रात्री दशावतारी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. एक दिवस आधी पंचक्रोशीतील उत्कृष्ट संघांमध्ये कबड्डीचे सामने व बक्षीस वितरण होणार आहे.
श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर, बावशी
प्रत्येक भाविकाची इच्छापूर्ती करणाऱ्या या मंदिरात, पारंपारिक पूजाअर्चा, होम हवन, जन्मोत्सव, महाआरती, महाप्रसाद पालखी मंदिर प्रदक्षिणा गाऱ्हाणे आणि नवसफेड तसेच रात्री सोन्याची शिरोळी, राधानगरी, कोल्हापूर येथील सोंगी भजनाचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे.
तरी परिसरातील तमाम भाविकांनी या मंदिरातील विविध उपक्रमामध्ये सहभागी होऊन उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रत्येक मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे.












