शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त अभियानाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचा पालक मेळावा संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात घेण्यासाठी सध्या कॉपीमुक्त अभियान हा उपक्रम सुरू केला आहे. ज्यामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांच्या बरोबर पालक वर्गाने देखील या अभियानात सहभागी व्हायचे आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन वैभववाडी येथे पालक सभा संपन्न झाली. विद्यार्थ्यांनी वेळेचे काटेकोर नियोजन करून तणावमुक्त वातावरणात परिक्षेला सामोरे जावे, परीक्षा काळात सोशल मीडिया पासून लांब रहावे व पालकांनी परीक्षा काळात पाल्याशी अभ्यासासंदर्भात वेळोवेळी हितगुज साधावे, असे मत कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी यावेळी व्यक्त केले.

परीक्षा काळात सध्या केंद्रारावरील वर्ग खोल्या व शालेय परिसरात सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्यामुळे कोणताही गैरप्रकार परीक्षा केंद्रावर होऊ नये यासाठी परीक्षा नियंत्रक मंडळ सतर्क आहे. अशा वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणाची भावना वाढेल आणि परीक्षेत पारदर्शकता येईल असे प्रशालेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले. या सभेदरम्यान पी.जे.सावंत व एस.व्ही.भोसले यांनी प्रशालेत मार्फत घेण्यात आलेल्या सराव परीक्षांचे इयत्ता निहाय गुण व श्रेणीसह निकालांचे वाचन केले व परीक्षा काळात आपल्या पाल्याची आरोग्य विषयक काळजी घेण्याचा सल्ला दिला. करिअरच्या दृष्टीने दहावी – बारावी परीक्षा महत्वाची असून त्यानंतर करिअरच्या विविध संधी कोणत्या आहेत, याबाबत उपस्थित पालकांना थोडक्यात माहिती दिली. सराव परीक्षांमध्ये ‘अ श्रेणी’ प्राप्त विद्यार्थ्यांच्या पालकांना या पालकसभेत विशेष प्राधान्य देण्यात आले होते.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, शाळा व्यवस्थापन समितीचे तेजस आंबेकर, माता पालक संघाच्या स्वराली कोलते, प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












