खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेचा इयत्ता ६ वीचा विद्यार्थी सुप्रबुद्ध संदेश पाटणकर यांची नुकतीच जवाहर नवोदय विद्यालय सांगेली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे निवड झाली असून, त्याच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. तर त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सुद्धा अभिनंदन करण्यात येत आहे.
राष्ट्रीय नवोदय स्पर्धा परीक्षा सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षी घेण्यात आली होती. या स्पर्धा परीक्षेमध्ये खारेपाटण केंद्र शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची निवड नवोदय विद्यालयाकरिता झाली असून विभा गिरीश धुमाळे हिची यापूर्वीच निवड झाली असून दोन दिवसापूर्वी पुन्हा प्रसिद्ध झालेल्या नवोदयच्या यादीत खारेपाटण केंद्र शाळेचा विद्यार्थी सुप्रबुद्ध संदेश पाटणकर यांची निवड झाली आहे. त्यामुळे खारेपाटण केंद्र शाळेने आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून आजपर्यंत या शाळेच्या एकूण ६ विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेत यश संपादन करत केंद्रीय स्तरावर शिक्षण देणाऱ्या राष्ट्रीय संस्थेच्या जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत आहेत. ही आपल्या शाळेसाठी व गावासाठी अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया खारेपाटण जि. प. केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व शिक्षण तज्ञ संतोष पाटणकर यांनी दिली.
खारेपाटण केंद्र शाळेचा विद्यार्थी सुप्रबुद्ध संदेश पाटणकर याची जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी सुप्रबुद्ध पाटणकर व त्याच्या पालकांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राप्ती कट्टी, उपाध्यक्ष प्रियंका गुरव, समिती सदस्य मंगेश ब्रम्हदंडे, खारेपाटण ग्रा. पं. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी देखील या विद्यार्थ्याचे अभिनंदन करून सुप्रबुद्ध याला त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











