ओरोस (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावठणवाडी येथील आदित्य उर्फ मंदार अजित परब (२४) आणि न्हावेली, रेवटेवाडी येथील किरण केशव परब (३०) या दोघांना अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी जिल्हा विशेष न्यायालयाने दोषी ठरवत दोघांनाही २० वर्षे कारावास व प्रत्येकी २० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अधिकचा चार महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
नात्यातील दोन भावांनी सावंतवाडी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अतिरीक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रंजना पाटील आणि गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.
सप्टेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० या कालावधीत हा गुन्हा घडला होता. यातील आरोपी आदित्य याने अल्पवयीन मुलीला एका सुपारीच्या बागेत बोलवून बळजबरीने तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले होते. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली होती. तर आरोपी किरण याने पीडित मुलीला घरी बोलवून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर दोघांनी वारंवार अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला होता. यातून अल्पवयीन मुलगी १० महिन्यांची गर्भवती राहिली होती. त्यामुळे फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार आदित्य आणि किरण यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता आणि साक्षीदारांची साक्ष तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत दोघांनाही २० वर्षे कारावास आणि प्रत्येकी २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास चार महिने जादा कैद अशी शिक्षा सुनावली आहे.












