जि. प. निवडणुकीत बांद्यात भाजपचे कमळ फुलले

प्रमोद कामत यांची बिनविरोध निवड

बांदा (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महत्वपूर्ण अशा बांदा जिल्हा परिषद मतदारसंघात मोठी घडामोड झाली असून भाजप महायुतीचे उमेदवार प्रमोद कामत हे बिनविरोध निवडून आले आहेत. बांदा शहर विकास आघाडीचे उमेदवार सुशांत पांगम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बांद्यात भाजपचे ‘बिनविरोध’ कमळ फुलले आहे. साहजिकच बांदा व तांबुळी पंचायत समितीसाठी भाजपाच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्गही सुकर झाल्याचे राजकीय विश्लेषकांनी स्पष्ट केले. बांदा जिल्हा परिषद मतदार संघाच्या इतिहासात प्रथमचउमेदवार बिनविरोध झाला आहे.

बांदा जिल्हा परिषद मतदार जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मतदार संघ असून याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष असते. या मतदारसंघात आपला जि. प. सदस्य असावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असते. या मतदारसंघावर भाजपाची मजबूत पकड आहे. सन २०१२ च्या गत निवडणुकीत प्रमोद कामत हे ७८६ मतांनी निवडून आले होते. त्यावेळी पहिल्याच टर्ममध्ये त्यांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती पदी वर्णी लागली होती.

भाजपचे उमेदवार प्रमोद कामत यांचा मतदार संघात दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानण्यात येत होता. भाजपाला शह देण्यासाठी बांदा शहर विकास आघाडी स्थापन करून सुशांत पांगम यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, प्रमोद कामत यांची संपूर्ण मतदारसंघात असलेली पकड पाहता त्यांचा विजय निश्चित मानण्यात येत होता. त्यामुळेच उमेदवार सुशांत पांगम यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊन प्रमोद कामत यांची जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीही बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे.गोवा – सिंधुदुर्ग सीमेवर असलेल्या या मतदार संघात भाजपने बिनविरोध बाजी मारल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक तरुणांनी ‘सीमेवर भाजपचे ओपनिंग’ असे स्टेटस ठेवले होते. या विजयामुळे पक्षाच्या स्थानिक संघटनेला नवीन ऊर्जा मिळाली आहे.

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, नीलमताई राणे, पालकमंत्री ना. नितेश राणे व आमदार निलेश राणे यांनी फोनवरून प्रमोद कामत यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!