वैभववाडीतील जेष्ठ नागरिक शांताराम रावराणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
एन.सी.सी. संचलन व कवायत सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधले
वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या उपस्थितीत वैभववाडीतील ज्येष्ठ नागरिक शांताराम (काका) रावराणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीत गायन केले. वाद्यवृंद कलाकारांनी यावेळी उत्तम साथ दिली. त्यानंतर शाळेच्या एन. सी. सी पथकाने शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. एन. सी. सी कॅडेट्सनी दिलेल्या मानवंदनेमुळे कार्यक्रमाला सैनिकी शिस्तीची झलक मिळाली. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर कवायत सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून भारतातील एकतेचे दर्शन यावेळी घडवले. देशभक्तीपर गीते, नृत्ये व भाषणांनी प्रशालेचा संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून गेला होता.
मुख्याध्यापक बी. एस. नादकर यांनी आपल्या मनोगतात भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांनी शिस्त, देशभक्ती व सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन केले. कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. पारितोषिक वितरणामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, जेष्ठ नागरिक शांताराम काका रावराणे, संचालक शरद नारकर, शांताराम देसाई. मुखाध्यापक बी. एस. नादकर. प्रशालेचे सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार व्ही.एस. मरळकर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.














