कोळपे जि. प. मतदारसंघात भाजपचा झेंडा; उबाठा सेनेला आणखी एक धक्का

प्रमोद रावराणे बिनविरोध; उबाठा सेनेचे अपक्ष उमेदवार जितेंद्र तळेकर यांचा अर्ज मागे

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधातील उबाठा सेनेचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज छाननीत बाद झाला होता. तर आज उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या दिवशी उबाठा सेनेचे अपक्ष उमेदवार जितेंद्र तळेकर यांनी अर्ज मागे घेतला. त्याचप्रमाणे भाजपचे डमी उमेदवार राजेंद्र राणे, अनंत फोंडके आणि अतुल सरवटे यांनीही अर्ज मागे घेतल्यामुळे एकमेव उमेदवार उरलेले प्रमोद रावराणे बिनविरोध झाले आहेत. याआधी कोकिसरे पंचायत समितीच्या भाजपच्या उमेदवार साधना नकाशे या देखील बिनविरोध ठरल्या होत्या. त्यामुळे उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत.

दरम्यान भाजपाचा विजयाचा वारू सुसाट सुटला असून भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे, तर उबाठा सेनेत सन्नाटा पसरला आहे. उबाठा सेनेचे सुनील नारकर यांचा अर्ज बाद झाल्यामुळे कोळपे मतदारसंघात भाजपच्या अधिकृत उमेदवार प्रमोद रावराणे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला होता. उर्वरित तीन अर्ज हे भाजपच्या डमी उमेदवारांचे होते. त्यामुळे एकमेव अपक्ष उमेदवार म्हणून उबाठा सेनेचे अपक्ष उमेदवार जितेंद्र तळेकर रिंगणात होते. त्यामुळे या मतदारसंघाकडे आणि तळेकर यांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अर्ज छाननीनंतर काही दिवस तळेकर ‘नॉट रिचेबल’ होते. तळेकर हे तिरवडे तर्फ खारेपाटण ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. त्यामुळे २६ जानेवारी रोजी ध्वजारोहनासाठी ते गावात दाखल झाले होते. त्यानंतर उबाठा सेना व भाजपचे पदाधिकारी त्यांच्या संपर्कात होते. अखेर भाजपाची राजकीय खेळी यशस्वी ठरली. मंगळवारी सकाळीच तळेकर यांनी अर्ज मागे घेतला आणि प्रमोद रावराणे यांचा विजय निश्चित झाला. जितेंद्र तळेकर यांचा भुईबावडा पंचायत समिती मतदार संघातून उबाठा सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून सुद्धा अर्ज आहे. आता तो अर्ज ते मागे घेणार की तसाच ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


error: Content is protected !!