सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : स्कुबा डायव्हिंग च्या वादातून मालवण दांडेश्वर मंदिरानजीक बीचवर जमाव गोळा करून घातक हत्याराने गंभीर जखमी करणे, साक्षीदार महिलांचा विनयभंग करणे, धमकी देणे तसेच मनाई आदेशाचा भंग केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी संतोष प्रकाश केळुसकर आणि महादेव प्रकाश केळुसकर ( रा. दांडी, मालवण ) या दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी नामंजूर केला. याकामी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. 16 जानेवारी 2026 रोजी दांडी किनारा येथे आरोपी संतोष प्रकाश केळुसकर, सुजल संतोष केळुसकर, सुहास मधुकर कोयंडे, रोहित अजित केळुसकर, महादेव प्रकाश केळुसकर, गीतांजली संतोष केळुसकर, हिना संतोष केळुसकर,जयेंद्र हेमंत शिरपुटे यांनी घातक हत्याराने नितीन द्वारकानाथ तोडणकर, राजन दत्तात्रय कांदळगावकर,, सविन दयाळ आडकर याना गंभीर मारहाण केली.तसेच साक्षीदार महिलेचा विनयभंग केला. धमकी दिली अशी फिर्याद युवराज नितीन तोडणकर याने मालवण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी संतोष प्रकाश केळुसकर आणि महादेव प्रकाश केळुसकर ( रा. दांडी, मालवण ) यांनी जामिनावर मुक्त होण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्याला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्द्यांकडे न्यायाधीशांचे लक्ष वेधले. या गुन्ह्यात आजन्म कारावास किंवा 1 ते 10 वर्षे कारावास शिक्षा आहे, आरोपिंचे नाव आणि ओळख फिर्यादीमध्ये नमूद असून त्यांनी नातेवाईकांच्या संगनमताने साक्षीदाराना गंभीर दुखापत करून जखमी केले आहे, संतोष केळुसकर याने हातातील लोखंडी रोड ने व महादेव केळुसकर याने हातातील दांड्याने साक्षीदार नितीन तोडणकर याना मारहाण केली आहे, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करायची असून त्या मोटरसायकल ची आरोपी विल्हेवाट लावू शकतात,आरोपी आणि फिर्यादी एकाच गावातील राहणारे असून जामीन मंजूर झाल्यास आरोपी फिर्यादी व त्याच्या कामगारांच्या जीवितास धोका निर्माण करू शकतात. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी वरील मुद्द्यांसह अन्य मुद्द्यांकडे न्यायाधीशांचे लक्ष वेधून आरोपीना जामीन मिळू नये यासाठी युक्तिवाद केला. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.












