पालकमंत्री नितेश राणे – सतीश सावंत, संदेश सावंत मांडीला मांडी लावून एकत्र बसलेले फोटो व्हायरल

सतीश सावंतांच्या मुख्य उपस्थितीत पालकमंत्री नितेश राणेंचा सत्कार

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली विधानसभा मतदारसंघाला राजकीय कलाटणी

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : पालकमंत्री नितेश राणे, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आणि माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत हे तिघेही एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पाहायला मिळाले. तेही भिरवंडे गावात. विश्वास बसत नाही ना ? पण हे सत्य आहे. राणे समर्थक असलेले परंतु 2019 मध्ये राणेंशी फारकत घेऊन उद्धव ठाकरेंसोबत गेलेले आणि मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात 2019 ची विधानसभा निवडणूक लढवणारे सतीश सावंत आज मंत्री नितेश राणेंच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसून आले. आणि ह्यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत हेही उपस्थित होते हे विशेष होय. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि विशेषतः कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी देणारी ही घटना 30 जानेवारी रोजी रात्री उशिरा कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावात घडली आहे. अलीकडेच 27 जानेवारी रोजी ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा अध्यक्ष असलेले सतीश सावंत यांनी आपण ठाकरे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत असल्याचे मिडियासमोर जाहीर केले. त्याच वेळी यापुढे आपण सत्ताधारी पक्षासोबत असू असेही सतीश सावंत यांनी जाहीर केले मात्र कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे उघड केले नव्हते. 28 जानेवारी रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवलीत सतीश सावंत भाजपात जाणार अशी खात्रीलायक चर्चा सुरू होती. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांची सभाच रद्द झाल्यामुळे सतीश सावंत यांचा भाजपा पक्षप्रवेश झाला नाही.दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीचे अर्ज मागे घेण्याच्या अंतिम घटकेआधी हरकुळ जि प मतदारसंघात झालेल्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील पडद्यामागील हालचालींना लक्षात घेत संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी सतीश सावंत यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध केल्याचेही बोलले जात होते. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 30 जानेवारी रोजी रात्री उशिरा खुद्द पालकमंत्री नितेश राणेंच्या मांडीला मांडी लावून बसलेले सतीश सावंत , संदेश सावंत आणि या दोन्ही सावंतांच्या उपस्थितीत मंत्री नितेश राणेंच्या सत्काराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मंत्री नितेश राणेंसोबत सतीश सावंत आणि संदेश सावंत यांचे व्हायरल झालेले हे फोटो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह विशेषतः कणकवली विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला कलाटणी देणारे राजकीय संकेत असल्याचे मानले जात आहे.

error: Content is protected !!