वैभववाडी (प्रतिनिधी) : मडगाव गोवा ते नांदेड असा खाजगी बसने प्रवास करीत असलेल्या प्रवाशाचा सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचा कॅमेरा अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. ही घटना दिनांक 28 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास करूळ विराज हॉटेल येथे घडली आहे. चोरटा बसमधील सी सी टीव्हीत कैद झाला आहे.
याबाबत किरण मारुती राठोड वय 19 रा. कर्नाटक राज्य याने वैभववाडी पोलीस ठाणेत तक्रार दिली आहे. राठोड याचा फोटोग्राफरचा व्यवसाय आहे. तसेच त्याचे स्वतःचे गोर फिल्म नावाचे चॅनल आहे. त्याने 8 डिसेंबर 2025 रोजी सुमारे अडीज लाख रुपये किंमतीचा नवीन कॅमेरा खरेदी केला होता. तो दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी शर्मा ट्रॅव्हल्सने नांदेड येथून गोवा येथे गाण्याच्या शूटिंगसाठी गेला होता. गोवा येथील काम आटपून तो 28 जानेवारी रोजी गोवा येथून शर्मा ट्रॅव्हल्सने नांदेडला जात होता. बस रात्री 8.30 वाजता करूळ विराज हॉटेल येथे थांबली होती. यावेळी राठोड हा खाली उतरून बाथरूमला जाऊन आला. बस येथून सुटल्यानंतर करूळ चेक नाका येथे पोलिसांनी तपासण्यासाठी थांबलवली. त्यावेळी राठोड यांच्या लक्षात आले की त्यांच्या बॅग मध्ये असलेला कॅमेरा गायब आहे.त्याने याबाबत बसच्या ड्रायव्हरला माहिती दिली. यावेळी बसमध्ये असलेला सिसीटीव्ही फुटेज तपासले असता, बस करूळ विराज हॉटेल येथे थांबलेली असतांना एक अनोळखी इसम त्यांच्या बॅग मधून कॅमेरा काढून घेऊन जात असलेला दिसत आहे. गाडीतील सर्व प्रवाशांना खाली उतरून घेऊन चौकशी करण्यात आली. मात्र प्रवाशांमधील कोणीही सीसीटीव्हीत कैद झालेल्या चेहऱ्याचे साम्य असलेला दिसून आलेला नाही. त्यामुळे अखेर राठोड यांनी आपला कॅमेरा चोरीस गेल्याची तक्रार वैभववाडी पोलीस ठाण्यात दिली आहे.












