- डाॅ. रुपेश पाटकर
……
गेल्या आठवडय़ात मला भेटायला एक तरुण आला होता. त्याने माझे ‘पर्यावरणीय बुद्धिमत्ता’ पुस्तक वाचले होते. ते वाचून तो प्रभावित झाला होता. त्याने मला म्हटले, ‘मी तुमचे पुस्तक वाचून इतका प्रभावित झालोय की मला पर्यावरणाच्या क्षेत्रात झोकून देऊन काम करायचे आहे. तुम्ही मला मार्गदर्शन करा!’
मी त्याला म्हटले, ‘वेगळे काही करायचे नाहीए. तुझा उपभोग कमी करत जा. प्रत्येक वस्तू वापरताना या वस्तूचे पृथ्वीवर एनव्हायरनमेंटल बर्डन होतेय, पर्यावरणीय ओझे होतेय याचा विचार कर. आणि जितक्या वस्तू वापरातून कमी करता येतील तितक्या कमी करत जा. सर्वसाधारणपणे लोक दरवर्षी आपला उपभोग कसा वाढता राहील याचा विचार करतात. पर्यावरणावर प्रेम करणाऱ्याने दरवर्षी आपला उपभोग कसा कमी होत जाईल याचा विचार केला पाहिजे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी माझा उपभोग कमी झाला पाहिजे याचा संकल्प कर!’
‘मी वस्तू वापरायच्या कमी केल्या म्हणून बाकीचे वस्तू कमी करणार नाहीत ना. त्यासाठी प्रचार केला पाहिजे, तो करायला मी उत्सुक आहे. तो कसा जास्तीतजास्त प्रभावी करता येईल ते सांगा,’ तो म्हणाला.
‘आचरण हे प्रचाराचे सर्वात मोठे आणि सर्वात प्रभावी माध्यम आहे,’ मी म्हणालो.
‘पण पर्यावरण र्हास इतका जलद होतोय की तुमच्या पद्धतीने काही होणार नाही असे मला वाटते,’ तो म्हणाला.
‘आपल्या कृतीने जग बदलणार नाही हे मला मान्य आहेच. पण माझा मुद्दा जग बदलण्याचा नाहीच आहे. माझा मुद्दा आहे की मला पर्यावरण नाशाच्या पापात सहभागी व्हायचे नाहीए,’ मी म्हणालो.
‘हे तुम्ही अध्यात्मिक बोलता,’ असे म्हणून तो निघून गेला. त्याने शेवटचा शेरा तुच्छतेने दिला खरा, पण मला तो काॅम्पलिमेंट वाटला.
……
– डाॅ. रुपेश पाटकर













