फोंडाघाटच्या राजकारणातील छुप्प्या रुस्तमच्या एंट्रीने निवडणूकीत रंगत
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राजन चिके यांनी रोवलेल्या बंडामुळे भाजपा शिवसेना युतीतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सदानंद उर्फ बबन हळदिवे यांना चिके यांनी आव्हान निर्माण केले आहे. फोंडाघाट जिल्हा परिषदच्या निर्णायकी लढतीत बबन हळदीवे यांचे बंधू भाई हळदीवे यांनी उडी घेतली आहे. जेष्ठ बंधू बबन यांच्या विजयासाठी भाई हळदीवे हे फोंडाघाट जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणसंग्रामात अत्यंत सक्रिय झाले आहेत. फोंडाघाट पंचक्रोशीच्या राजकारणात भाई हळदीवे याना छुपा रुस्तम म्हटले जाते. विरोधकांच्या नजरेआड राहून डावपेच टाकणे आणि अंदाज लागू न देता आपली खेळी करून समोरच्याची पाठ मातीला लावण्यात माहीर असलेला चतुर सिंघम या शब्दांत भाई हळदीवे बद्दल बोलले जाते. खासदार नारायण राणे यांचा कट्टर समर्थक असलेले भाई हे फोंडाघाटचे सुमारे 8 वर्षे शिवसेना शाखाप्रमुख होते. अस्सल शिवसैनिक असलेले भाई यांचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर असलेले प्रेम फोंडाघाट पंचक्रोशीत सर्वश्रुत आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवर जिल्हा परिषद निवडणूक लढवत असलेल्या बंधू बबन यांच्या विजयासाठी भाई सध्या अथक मेहनत घेत आहेत. बबन यांच्या प्रचारासाठी आपल्या होमपीच फोंडाघाट सह पियाळी, लोरे, घोणसरी, नवीन कुर्ली वसाहत, वाघेरी आदी गावांत आपल्या संपर्कात असलेल्या जुन्या नवीन शिवसैनिक, तसेच मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत सध्या भाई आपले बंधुराज बबन हळदीवे यांच्या विजयासाठी मेहनत घेत आहेत. प्रचारासाठी सकाळी 10 ते सायंकाळी किंवा रात्री ही वेळ शक्यतो उमेदवार आणि कार्यकर्ते निवडतात. पण भाई हळदीवे अगदी सकाळी 7 वाजताच मतदारांच्या घरी आपुलकीची चहा पीत भाऊ बबन यांचा प्रचार करताना आढळतात. आपल्या या छुप्या प्रचाराबद्दल भाई हळदीवे यांना विचारले असता भाऊ बबन साठी मैदानात उतरलोय एवढे मोजकेच बोलून आणखी बोलण्यास भाई यांनी नकार दिला. मात्र छुपा रुस्तम असलेल्या भाई हळदीवे यांनी भाऊ बबन हळदीवे यांच्या विजयासाठी फोंडाघाट जिल्हा परिषद निवडणूकीच्या मैदानातील एंट्रीने चुरस असलेली फोंडाघाट जिल्हा परिषद निवडणूक आणखी रंगतदार होऊ लागली आहे.












