“जिल्ह्यात होत असलेल्या निवडणुका एकतर्फी होणार असल्याचे स्पष्ट संकेत…” – नामदार नितेश राणे
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात झालेल्या लोकसभा, विधानसभा ग्रामपंचायत व होऊ घातलेल्या जि. प. आणि पं. स. च्या निवडणुका या एकतर्फी होणार असल्याचे जणू स्पष्ट संकेतच जनतेने आम्हाला दिलेले असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजय आमचाच होणार असल्याचे उदगार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत मार्गदर्शन करताना काढले.
खारेपाटण रामेश्वर नगर येथे खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील खारेपाटण पंचायत समितीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे व तळेरे पंचायत समितीचे उमेदवार राजेश जाधव या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ खारेपाटण येथे नामदार नितेश राणे आले होते. यावेळी येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, शिवसेना शिंदे पक्ष तालुका अध्यक्ष मंगेश गुरव, शरद वायगणकर, मंगेश ब्रम्हदंडे, माजी जि. प. बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार, माजी जि. प. सदस्य रत्नप्रभा वळंजू, माजी पं. स. सदस्य तृप्ती माळवदे, खारेपाटण सरपंच, भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत, भाजप पक्षाच्या बिनविरोध निवडून आलेल्या नव निर्वाचित खारेपाटण जि. प. सदस्य प्राची ईसवलकर, खारेपाटण पंचायत समितीचे उमेदवार गुरुपसाद शिंदे, तळेरे पंचायत समितीचे उमेदवार राजेश जाधव आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान खारेपाटण येथील महायुतीच्या कार्यकत्यांच्या वतीने नामदार नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि गुलाबाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. तर खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाच्या बिनविरोध निवडून आलेल्या भाजप पक्षाच्या उमेदवार प्राची ईसवलकर यांचा नामदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच खारेपाटण जि. प. मतदार संघांमधील दोन्ही पंचायत समितीच्या उमेदारांनी देखील मंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले.
निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उबाठा पक्षाला दणका
जि. प. आणि पं. स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ खारेपाटण येथे रविवारी सायंकाळी झालेल्या महायुतीच्या कॉर्नर सभेत शिवसेना उभाठा पक्षाच्या भूषण शेलार व वैभव कांबळे या दोन शाखा प्रमुखासह शेर्पे व साळीस्ते येथील सुमारे २७ महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे नामदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत करून आपल्या भागातील विकास कामासाठी १०० टक्के विकास निधी दिला जाईल असा विश्वास पालकमंत्री या नात्याने कार्यकर्त्यांना दिला.
गुरुप्रसाद शिंदे यांना निवडून आणून आमदार नीलेश राणे यांना दिलेला शब्द पूर्ण करूया
खारेपाटण येथील जनता राणे कुटुंबीयांवर प्रेम करणारी असून संपूर्ण जिल्ह्यात नेहमीच नंबर १ चे मताधिक्य प्रत्येक निवडणुकीत येथील मतदारांनी आम्हाला व आमच्या पक्षाला दिलेले आहे. त्यामुळे या मतदार संघात पूर्ण ताकदीने महायुतीच्या गुरूप्रसाद शिंदे व राजेश जाधव या उमेदवाराचे काम करून व त्यांना निवडून आणून व महायुतीचा धर्म पाळून आमदार नीलेश राणे यांना दिलेला शब्द आपण पूर्ण करूया.
खारेपाटणला साजेसे मतदान झाले पाहिजे
खासदारकी असो की आमदारकी व झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक खारेपाटण मधील जनता नेहमीच आमच्या सोबत १ नंबरचा मताधिक्याने आमच्या पाठीशी उभी राहिली असून त्याचे मी आभार व्यक्त करतो. त्यामुळे तुम्ही खारेपाटणला साजेसे मतदान करा. पालकमंत्री म्हणून मी जबाबदारीने सांगतो येथील विकास तेवढाच साजेसा व झपाट्याने केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
खारेपाटण येथील सभेची जागा आम्हाला विजय प्राप्त करून देते
खारेपाटण रामेश्वर नगर येथील सुरेश जामसंडेकर यांचे घराचे अंगण ही आमच्या सभेसाठी निवडलेली जागा आम्हाला प्रत्येक निवडणुकीत विजय प्राप्त करून देत आलेली आहे. खासदार नारायण राणे यांची सभा येथेच झाली माझी आमदारकीची सभा येथेच झाली. आम्ही निवडून देखील आलो व नुसते निवडून नाही आलो तर थेट मंत्री सुद्धा झालो. त्यामुळे आपल्या उमेदवाराचा विजय हा निश्चित असल्याचे शुभसंकेत यावेळी नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
राणे कधीच डबल नसतात जिथे असतात तिथे प्रामाणिक असतात
खारेपाटण मध्ये कोणी अपक्ष उमेदवार आमचे नेत्यांचे स्टेटस लावून अगर प्रचार करत असेल तर त्यांनी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये. खारेपाटण पंचायत समितीचे आमचे महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे हेच असून त्यांनाच निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून राणे कधीच डबल नसतात. ज्यांच्या सोबत जिथे असतात तिथे १०० टक्के प्रामाणिक असतात म्हणून आम्हाला राणे म्हणतात. त्यामुळे या मतदार संघात कुणी वातावरण खराब करू नये. असा अप्रत्यक्ष टोला खारेपाटण पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार रफिक नाईक यांना लगावला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच २५ सदस्य हे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायूतीच्या माध्यमातून बिनविरोध निवडून आले असून त्यामुळे या जिल्ह्याला विकासाकडे घेऊन अगर कोणी जात असेल तर ते फक्त राणेच घेऊन जाऊ शकतात. हा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाल्यामुळेच हे २५ सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे नामदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ बिनविरोध केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे मानले आभार
खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या भाजप पक्षाच्या प्राची ईसवलकर या पहिल्या महिला उमेदवार असून त्यानंतर जिल्ह्यात आणखी सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र खारेपाटण विजयात ज्यांनी सहकार्य केले ते आमचे कार्यकर्ते रवींद्र जठार, दिलीप तळेकर, रमाकांत राऊत, उज्ज्वला चिके यांचे मी आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. रामकांत राऊत या आमच्या त्यागी कार्यकर्त्याचा पक्षात निश्चित सन्मान केला जाईल असा विश्वास नामदार राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
संपूर्ण सभेचे सूत्रसंचलन शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी केले तर सभेचे प्रास्ताविक भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी केले. यावेळी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेना भाजप महायुतीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












