मालवणात 111 मतदान केंद्रावर होणार मतदान

मतदान यंत्रे मतदान केंद्रांवर रवाना; 6 जिल्हापरिषद व 11 पंचायत समिती जागांसाठी निवडणूक

तालुक्यात 74,729 मतदार

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व 11 पंचायत समिती जागांसाठी शनिवार 7 फेब्रुवारी रोजी 111 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात बारा झोनल अधिकाऱ्यांसह 444 अधिकाऱ्यांची नियुक्ती मतदान केंद्रावर करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावरील मतदान यंत्रे मतदान केंद्र अध्यक्ष व अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर रवाना करण्यात आली आहेत.

शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी मालवण तालुक्यातील मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे रवाना करण्यात आली आहेत.

सखी मतदान केंद्र सर्जेकोट
मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबंदा हे सखी मतदान केंद्र असणार आहे. याठिकाणी मतदान केंद्र अध्यक्ष डॉ. सुमेधा नाईक यांसह मतदान अधिकारी अनुष्का कदम, मतदान अधिकारी राधा दिघे, मतदान अधिकारी शुभांगी लोकरे तसेच कर्मचारी सिमाली परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सखी केंद्र झोनल अधिकारी म्हणून श्वेता यादव काम पाहणार आहेत. क्षेत्रीय अधिकारी म्हणून मकरंद कुलकर्णी काम पाहणार आहेत. यासोबत मालवण तालुक्यातील गोळवण जि. प. शाळा नं. 2 हे आदर्श मतदान केंद्र असणार आहे.

मालवण तालुक्यात 74,729 मतदार
मालवण तालुक्यात 36,626 पुरुष मतदार तर 38,103 स्त्री मतदार असे एकूण 74,729 मतदार आहेत. शनिवार 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 हा मतदानाचा कालावधी असणार आहे. तर सोमवार 9 फेब्रुवारी रोजी शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे मतमोजणी होणार आहे.

error: Content is protected !!