सिंधुदुर्गातील पत्रकार नीतिमूल्यावर आधारित पत्रकारिता करतात – दीक्षांत देशपांडे

कणकवली तहसील कार्यालयात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचला. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. वृत्तपत्र हे समाजाचा आरसा आहे. सिंधुदुर्गातील पत्रकारिता दर्जेदार आहे. जिल्हयातील पत्रकार हे नितीमूल्यांवर आधारित पत्रकारिता करीत आहेत, असे प्रतिपादन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती कणकवली तालुका पत्रकार संघ व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तहसीलदार यांच्या दालनात शुक्रवारी साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष वायंगणकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, सचिव संजय सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष रमेश जोगळे, कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई, वीरेंद्र चिंदरकर, महेश सरनाईक, सुधीर राणे, संजय पेटकर, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष उमेश बुचडे, भास्कर रासम, दिगंबर वालावलकर, मिलिंद पारकर, राजन चव्हाण, तुषार हजारे, अमित मांडवकर, नायब तहसीलदार मुकुंद मंडले, मंडळ अधिकारी मनीषा बोडके, सहायक महसूल अधिकारी संभाजी खाडे, महसूल सहायक हेमलता तोरसकर, महसूल सहाय्यक रणजीत चौगुले, महसूल सहाय्यक मंगल गायकवाड, क्रांती सावंत, धनश्री आरोलकर आदी उपस्थित होते.

श्री. देशपांडे म्हणाले, केवळ ३२ वर्षांचे अल्प आयुष्य लाभूनही आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. ज्या काळात कोणतीही परंपरा नव्हती, अशा काळात सिंधुदुगार्तून मुंबई गाठून त्यांनी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. आजच्या काळात समाज प्रबोधनासाठी पत्रकारांनी आपली लेखणी अधिक धारदार करावी, प्रशासन कायम तुमच्या पाठीशी उभे राहील. ​काळाच्या ओघात पत्रकारितेचा रोल बदलला असला तरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी आपली नीतीमूल्ये जपली आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. समाजाप्रबोधन घडवून आणण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा. समाजाचा आरसा म्हणून पत्रकार जसे वागतात, तसाच समाज घडत जातो. चांगल्या कामासाठी प्रशासन नेहमीच तुमच्या सोबत असेल. संतोष वायंगणकर म्हणाले, ज्या जिल्ह्यात आद्य पत्रकारांचा जन्म झाला, तिथे काम करणे हे आपले भाग्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि आजची पत्रकारिता यात जमीन-अस्मानाचा फरक असला, तरी जिल्ह्यातील पत्रकार आजही प्रामाणिकपणे आपली नितीमूल्ये जोपासत आहेत. अशोक करंबेळकर यांनी मनोगत व्यक्त करताना जांभेकरांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. आरंभी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविक भगवान लोके यांनी केले. आभार संजय सावंत यांनी मानले.

error: Content is protected !!