मुंबई–विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवेला १ मार्चपासून प्रारंभ; ६–७ तासांत सागरी प्रवास शक्य

मुंबई (प्रतिनिधी) : देशात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनाला अनुसरून तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यान रो-पॅक्स प्रवासी फेरी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सेवेमुळे मुंबई आणि कोकण दरम्यान सागरी मार्गाने जलद, आरामदायी आणि आनंददायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत जलवाहतुकीला चालना देण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात येत असून, या मार्गावर प्रवासी रो-पॅक्स सेवा चालविण्याची परवानगी एम2एम फेरी प्रा. लि. या कंपनीला देण्यात आली आहे. सदर संस्था सध्या मुंबईतील भाऊचा धक्का ते रायगड जिल्ह्यातील मांडवा या मार्गावर यशस्वीपणे रो-पॅक्स सेवा चालवत असून, त्यांना या क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे.

मुंबई–विजयदुर्ग मार्गासाठी ‘एम2एम प्रिन्सेस’ हे आधुनिक व सर्व सुविधा युक्त जहाज वापरण्यात येणार आहे. एका फेरीमध्ये ६२० प्रवासी आणि ३५ वाहने वाहून नेण्याची या जहाजाची क्षमता आहे. या सेवेमुळे अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबईहून विजयदुर्ग येथे पोहोचणे शक्य होणार आहे.

या सेवेची उद्घाटन फेरी दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता फेरी व्हार्फ, मुंबई येथून मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
मुंबईहून प्रस्थान – दर बुधवारी व शनिवारी सकाळी ८.०० वाजता
विजयदुर्गहून प्रस्थान – दर गुरुवारी व रविवारी दुपारी १२.०० वाजता

प्रवासी भाडे :
इकॉनॉमी – ₹३,०००
प्रीमियम इकॉनॉमी – ₹५,०००
बिझनेस – ₹७,०००
फर्स्ट क्लास – ₹९,०००

वाहन भाडे :
XL (अतिरिक्त मोठी कार) – ₹९,०००
L (मोठी कार) – ₹८,०००
M (मध्यम कार) – ₹७,०००
S (लहान कार) – ₹६,०००
दुचाकी – ₹१,०००
सायकल – ₹६००

कोकणातील सणासुदीच्या काळात रेल्वे आरक्षणाची अडचण तसेच रस्ते वाहतुकीतील वाढती कोंडी लक्षात घेता, ही फेरी सेवा कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. या उपक्रमामुळे कोकणातील पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक संपर्क वाढीस चालना मिळणार असून, सागरी वाहतुकीला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या फेरी सेवेसाठी तिकीट विक्री सुरू झाली असून www.m2mferries.com या संकेतस्थळावरून तिकीट बुकिंग व अधिक माहिती मिळू शकते.

error: Content is protected !!