नोकरीचे आमिष दाखवून वैभववाडीतील उच्चशिक्षित तरुणाला गंडा…

​वैभववाडी (प्रतिनिधी) : ​वैभववाडी तालुक्यातील एका उच्चशिक्षित तरुणाला ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरीचे आमिष दाखवून अज्ञात भामट्यांनी १५ हजार रुपयांना गंडा घातला आहे.याप्रकरणी संबंधित तरुणाने राष्ट्रीय सायबर विभागाकडे धाव घेत आपली तक्रार नोंदवली आहे.

​या घटनेची सविस्तर माहिती अशी की, पीडित तरुणाच्या व्हॉट्सॲपवर एका अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला होता. आम्ही एका व्यापारी प्रमोशन टीम कंपनीतून बोलत असून आमच्याकडे ‘वर्क फ्रॉम होम’ कामासाठी लोकांची गरज असल्याचे त्याला सांगण्यात आले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी कंपनीने त्याला केवळ २०० रुपये जमा करण्यास सांगितले. तरुणाने २०० रुपये भरल्यानंतर त्याला परतावा म्हणून ३०० रुपये मिळाले. यामुळे कंपनीवर विश्वास बसलेल्या तरुणाला त्यानंतर ५ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले.

​तरुणाने यूपीआयद्वारे ५ हजार रुपये भरले, मात्र त्याचा मोबदला मागितला असता कंपनीने पुन्हा १० हजार रुपये भरण्याची अट घातली. अशा प्रकारे तरुणाने एकूण १५ हजार रुपये कंपनीकडे जमा केले. या बदल्यात त्याला २१ हजार ६९९ रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, जेव्हा त्याने या रकमेची मागणी केली, तेव्हा कंपनीने त्याला पुन्हा ३० हजार रुपये भरण्यास सांगितले. यावेळी आपली फसवणूक होत असल्याचे तरुणाच्या लक्षात आले. त्याने तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधून संबंधित कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना समाजासाठी धोक्याची घंटा असून, अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडता नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!