कणकवली कॉलेजमध्ये रसायनशास्त्राची जिल्हास्तरीय सेमिनार स्पर्धा ‘केम फेस्ट’ संपन्न
कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता व सृजनशीलता वाढीस लावण्यासाठी, टीम वर्कने काम करण्याची सवय निर्माण करण्यासाठी व कम्युनिकेशन स्किल्स सुधारण्याकरिता सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांना सामोरे जाऊन आपले व्यक्तिमत्व सजग करण्याचा प्रयत्न करावा. तसेच अशा स्पर्धांकडे परीक्षेपलीकडचे शिक्षण म्हणून पाहिले पाहिजे, असे आवाहन कणकवली महाविद्यालयात आयोजित रसायनशास्त्र विषयावरील जिल्हास्तरीय सेमिनार स्पर्धा ‘केम फेस्ट’ चे उद्घाटन करताना कणकवली कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी विद्यार्थांना केले.
कणकवली कॉलेज कणकवली व स. ह. केळकर कॉलेज, देवगड च्या रसायनशास्त्र विभागांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कणकवली महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. राजेंद्र मुंबरकर, परीक्षक डॉ. महेश साटम, प्रमुख पाहुणे म्हणून स. ह. केळकर महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी. डी. भेंकी, व कणकवली महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शामराव डिसले उपस्थित होते.
या स्पर्धेच्या प्रास्ताविकात डॉ. शामराव डिसले यांनी ही स्पर्धा घेण्यामागचा उद्देश सहभागी विद्यार्थी वर्गाला समजावून सांगितला.डॉ. सी. डी. भेंकी यांनी अशा प्रकारच्या सेमिनार स्पर्धेचे महत्त्व सांगितले. परीक्षक डॉ. महेश साटम यांनी सेमिनार सादरीकरण कशा प्रकारे करावे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, स. ह. केळकर महाविद्यालय देवगड व कणकवली कॉलेज, कणकवली या चार महाविद्यालयातील रसायनशास्त्र विषयांमध्ये पदवीचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांचे एकूण आठ ग्रुप सहभागी झाले होते. सेमिनार स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना रसायनशास्त्रातील सहा विषय देण्यात आले होते. यामध्ये हरित रसायनशास्त्र: शाश्वत भविष्यासाठी , नॅनो रसायनशास्त्र: अतिसूक्ष्माचे सामर्थ्य, पर्यावरणीय रसायनशास्त्र: आपल्या पृथ्वीचे रसायनशास्त्र, औषध निर्मिती रसायनशास्त्र, पॉलिमर रसायनशास्त्र व दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र असे विषय देण्यात आले होते. त्यापैकी एक विषय निवडून विद्यार्थ्यांनी पॉवर पॉईंट सादरीकरण करावयाचे होते. यासाठी प्रत्येक ग्रुपला सात मिनिटे वेळ देण्यात आला होता. या सेमिनार स्पर्धेचे परीक्षण एस. एस. पी. एम. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवलीच्या रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. महेश साटम यांनी केले .
या सेमिनार मध्ये प्रथम क्रमांक संयुक्तपणे कणकवली कॉलेज, कणकवलीच्या दीक्षा मलये, प्रेरणा जाधव व संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळच्या सर्वेश रेवडेकर, सिमरन नदाफ यांनी पटकावला. दुसरा क्रमांक संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या हर्षदा परब व कोमल गडम यांच्या ग्रुप ला मिळाला. तसेच तिसरा क्रमांक कणकवली कॉलेज, कणकवली मधील सानिका मेस्त्री व भक्ति सावंत यांनी प्राप्त केला. या स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये अभिव्यक्ती कौशल्याचा विकास व्हावा, तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, संशोधनात्मक वृत्ती जोपासली जावी व आत्मविश्वास वाढीस लागावा या उद्देशाने करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत गावित यांनी केले तर आभार प्रा.अविनाश पोरे यांनी मानले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. महालिंगे, स. ह. केळकर महाविद्यालयाचे प्राचार्य कुन्नुरे व उपप्राचार्य सिरसाठे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ चे रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पिटर रॉड्रिग्ज व आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडीचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर सिरसट यांचेही विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. कपिल गडेकर, प्रा. अक्षय जाधव, प्रयोगशाळा सहाय्यक गुरुनाथ सावंत, सचिन भगत रवींद्र लाड यांचे सहकार्य लाभले.












