तुका म्हणे काही न मागो आणिक | तुझे पायी सुख सर्व आहे | – वारकरी नामदेव हुले यांचा हृद्य गौरव

पंढरीच्या ६५ वाऱ्या करुनही संसार आणि अध्यात्माची सांगड घालणारे बाबा हुले

फोंडाघाट (प्रतिनिधी) : बालपणापासून आणि कौटुंबिक संस्कारातून विठूमाऊलीची भक्ती करताना, कोट्यावधी वारकरी संसार आणि अध्यात्माची सांगड घालून ऐहिक सुखात तल्लीन होतात. अशीच एक प्रभूती हरकुळ खुर्द हुलेवाडी येथील नामदेव शंकर हुले तथा हुले बुवा यांच्या सातत्यपूर्ण ६५ वाऱ्या पूर्ण केल्याबद्दल, फोंडाघाट ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांनी कृतज्ञतापूर्वक विठू माऊलीचे आभार मानताना, आपल्या भावनांना वाट करून दिली. शेतकरी कुटुंबातील बुवांनी वयाच्या चौथ्या/पाचव्या वर्षी आजी आणि वडिलांचे बोट पकडून वारीला सुरुवात केली. त्याकाळी फोंडाघाटचे ह. भ. प. बाबा मुणगेकर, दळवीबुवा, परिसरातील भावीक आणि वारकरी विठू नामाच्या अभंगात टाळमृदंगाच्या साथीने पंढरपूर पाई वारी करीत असत. त्यांच्या दिंडीतून हुले बुवा यांनी पायी वारी सुरू केली. यातूनच त्यांना माऊलीची भक्ती आणि भजन-कीर्तनाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी या संप्रदायातील श्री संत नामदेव महाराज यांचे शिष्य, वासकर बुवांना गुरुस्थानी मानले आणि भक्ती आणि श्रद्धेचा मार्ग चोखाळला.

अहमदाबाद दंगलीतून वारीसाठी प्रस्थान, चार अपघाती घटनेवेळी — “सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी”चा साक्षात्कार झाला. त्यासाठी ग्रहण काळात पाण्यात उभे राहून केलेली साधना फळा आली. कोरोना काळात गनिमीकाव्याने केलेली लपून-छपून वारी रोमांचक ठरली. आयुष्यात असे अनेक सुखदुःखाचे, चढउताराचे प्रसंग केवळ माऊलीच्या कृपाप्रसादाने आणि भजनाच्या आवडीने निभावले, यावर त्यांचा दाट विश्वास आहे. आज ६५ वाऱ्या आषाढी-कार्तिकी आणि माघ वारी पूर्ण झाल्या असताना– “तुका म्हणे काही न मागो आणखी | तुझे पायी सुख सर्व आहे |” ही कृतज्ञतेची भावना जोपर्यंत पाय आणि शरीर साथ देते तोपर्यंत वारी सुरू राहणार असल्याचा निर्धार नामदेव हुले यांनी व्यक्त केला आणि हा गौरव नक्कीच ताकद देईल असे शेवटी त्यांनी बोलून दाखवले.

error: Content is protected !!