पोईप (प्रतिनिधी) : तालुक्यातील चुनवरे तळेवाडी येथील रहिवासी तथा मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी रमाकांत धाकू उर्फ आर.डी. परब (७७) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी सकाळी चिपळूण येथील रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले. रमाकांत परब हे संपूर्ण मालवण तालुक्यात आर.डी. परब या नावाने परिचित होते.
मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्तीनंतर आर.डी. परब यांनी मालवण तालुक्यातील चुनवरे येथे स्थायिक होऊन विविध सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. प्रगतशील शेतकरी बागायतदार म्हणूनही ते या परिसरात परिचित होते. आर.डी परब यांनी परिसरातील शाळांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून मोठ्या प्रमाणात निधी देऊन संस्थेला सहकार्य केले होते. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ते या परिसरात प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, मेहुणे, भाचे, नातवंडे असा परिवार आहे. चिपळूण येथील अवनीश रुग्णालयाचे डॉ. हर्षद परब तसेच झोन युनिव्हर्सिटी चे प्राध्यापक डॉ.सुनील परब यांचे वडील, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारिणी सदस्य दीपक भोगले, मालवण पंचायत समितीचे माजी सदस्य तथा भोगले मेडिकल चे अरुण भोगले यांचे ते भाओजी, तर डॉ.अस्मिता परब यांचे ते सासरे होत. त्यांच्यावर मंगळवारी चिपळूण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वैद्यकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.












