फोंडाघाट महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती उत्साहात साजरी

विद्यार्थ्यांच्या लोकगीत भित्तिपत्रकाचे प्रकाशन; कुसुमाग्रजांच्या कार्याचा गौरव

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मराठी भाषेचा अभिमान जागृत ठेवत, लोकपरंपरेच्या जतनाचा संदेश देणारा मराठी भाषा गौरव दिन व कविवर्य कुसुमाग्रज जयंती सोहळा, कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी लोकपरंपरा आणि मौखिक साहित्याचे जतन करण्याच्या हेतूने संकलित केलेल्या लोकगीतांच्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यांच्या साहित्यिक कार्याचा आणि मराठी भाषेला दिलेल्या अमूल्य योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिन हा त्यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो, याची आठवण करून देत उपस्थितांनी भाषिक अभिमान व्यक्त केला. यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. सतीश कामत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुसुमाग्रजांचे साहित्य, त्यांच्या कवितांमधील मानवी मूल्यांची जपणूक आणि सामाजिक भान यावर सविस्तर विवेचन केले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची आणि अस्मितेची ओळख आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. लोकपरंपरेतील गीते, ओव्या, म्हणी आणि कथा या समाजाच्या भावविश्वाचे जिवंत दस्तऐवज आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे होते. आपल्या भाषणात त्यांनी लोकगीतांचे संकलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. बदलत्या काळात मौखिक साहित्य लोप पावण्याची भीती असताना विद्यार्थ्यांनी केलेले हे संकलन कार्य अत्यंत स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण संस्कृतीचे जतन होऊन विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती विकसित होते, असेही त्यांनी नमूद केले. शिवाय मराठी शाळा कमी होत असल्याने मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले व मराठी भाषा जतन संवर्धन करण्याचे कार्य मराठी माणसालाच करावे लागेल असेही मत त्यांनी यावेळी मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जगदीश राणे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना लोकपरंपरेचे जतन ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी गावोगावी जाऊन ज्येष्ठ नागरिकांकडून लोकगीते संकलित केली असून त्याचे भित्तिपत्रक स्वरूपात सादरीकरण केले आहे, ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमानाची भावना अधिक बळकट झाली आहे.

error: Content is protected !!