नेरुरुचा “देवराई” संघ ठरला “मालवणी करंडक”चा मानकरी…

महोत्सवाचा थाटात समारोप; संदिप गावडेंसह मायकल डिसोझांंचा सन्मान…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ओंकार कलामंच सावंतवाडी आणि पाटणकर एज्यूकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या मालवणी करंडक महोत्सवाचा नेरुर येथील आयडीएल इंग्लिश स्कुल यांचा “देवराई” हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. रत्नागिरी येथील अभियांत्रिकी कला मंडळ यांची “तुकारामाची टोपी” या संघाने व्दितीय तर अंधेरी येथील रंगवलय या नाट्यसंस्थेच्या “बार बार” या एकांकीकेने तृतीय क्रमांक पटकावला.

या महोत्सवाच्या समारोपा प्रसंगी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य संदिप गावडे व मायकल डिसोझा यांचा स्वागत समितीचे अध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर मालवणी भाषेसाठी मालवणी करंडक महोत्सव समितीकडुन सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे, असे मत संदिप गावडे यांनी यावेळी व्यक्त केले. तब्बल चार दिवस सावंतवाडी येथील पालिकेच्या उद्याना समोरील जागेत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात तब्बल १२ संघांनी सहभाग घेतला. यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून लपंडाव एकांकीेके मधील ओन्याला गौरविण्यात आले तर सर्वोत्कृष्ट अभिनेती (सायलेंड स्क्रीम), सर्वोत्कृष्ट नायिका तृतीय संस्कृती शर्मा, सर्वोत्कृष्ट लेखक किशोर नाईक (देवराई), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किशोर नाईक (देवराई), सर्वोत्कृष्ट वाचिक मराठी अजित मांजरेकर (अमृत्स्यपुत्र), सर्वोत्कृष्ट वाचिक मालवणी प्रणाली देऊलकर (गार्‍हाणा), सर्वोत्कृष्ट बालकलाकार आरोही मेस्त्री (पडीक), सर्वोत्कृष्ट बालकलाकार द्वितीय अनुरा चौधरी (देवराई), सर्वोत्कृष्ट बालकलाकार तृतीय आयुष चव्हाण (देवराई), सर्वोत्कृष्ट नेपथ्य श्याम सारंग (देवराई), सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना (तुकारामाची टोपी), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत (पडीक), आदींना गौरविण्यात आले.

यावेळी संदिप गावडे यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, हे व्यासपीठ एकांकीका स्पर्धेचे आहे. त्यामुळे याठिकाणी व्यक्त होताना जबाबदारीने व्यक्त व्हावे लागते. या ठिकाणी ज्या एकांकीका स्पर्धा पार पडल्या त्यामुळे या महोत्सवाची उंची वाढली आहे. एकीकडे युध्द आणि बॉम्ब यांच्या बातम्या येत आहेत. मात्र दुसरीकडे सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर हा सुंदर महोत्सव रंगला आहे. हे अभिमानास्पद आहे. येणार्‍या काळात मनोरंजनाचा पत्ता काय? तर ओंकार कलामंचाने हे पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून दिले आहे. त्यामुळे रुजूल पाटणकर आणि अमोल टेंबकर यांनी यात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.

यावेळी मायकल डिसोजा यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मालवणी करंडक महोत्सवामुळे कलाकारांना व्यासपीठ देण्याचे काम झाले आहे. हे कौतुकास्पद आहे. येणार्‍या काळात या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत-जास्त संघ सहभागी व्हावेत, असे आवाहन करीत त्यांनी खास मालवणी भाषेतून उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून रिल स्टार गौरी बांदेकर, स्वरुप कासार, गायक नितीन बांदेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, पत्रकार निलेश जोशी आदींचा सन्मान करण्यात आला.

हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष अमोल टेंबकर, उपाध्यक्ष ऋजूल पाटणकर,सचिव भुवन नाईक, सहसचिव सचिन मोरजकर, खजिनदार श्रेयस मुंज, सदस्य निरंजन सावंत, अनिकेत आसोलकर, आनंद काष्टे, निखिल माळकर, सावली पाटकर, प्रशांत सावंत, हेमंत पागंम, आर्या टेंबकर, ओम टेंबकर, आराध्या मोरजकर, कश्मीरा पाटणकर, भालचंद्र लांबर, मृणाल पावसकर, प्रणव तारी, सिध्देश नेरुरकर, हर्ष जाधव, अक्षय माशाळ, अंकिता काष्टे, शंशाक काष्टे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले तर आभार अमोल टेंबकर यांनी मानले.

error: Content is protected !!