बांदा (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपरिषद, घे भरारी फाउंडेशन आणि फिटनेस योग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 5 दिवसीय मोफत योगशिबिराचा प्रारंभ आज, शनिवार दि. 20 जून रोजी सकाळी 6.30 वाजता जिमखाना हॉल येथे उत्साहात झाला.
या शिबिराचे उद्घाटन नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिबिराचे अध्यक्ष म्हणून योग शिक्षक शेखर बांदेकर उपस्थित होते.
या प्रसंगी फिटनेस योग अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष नारायण सावंत, कोषाध्यक्ष रवींद्र प्रभू देसाई, फिटनेस किड्स अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष विशाल लातये, फिटनेस महिला अकॅडमीच्या जिल्हाध्यक्षा रसिका सावंत,अरुण पवार, सौ. अनघा चव्हाण व चेतना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर शेखर बांदेकर यांनी उपस्थित साधकांना सूर्यनमस्कार, विविध आसने व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून घेतले. आसनांची माहिती त्यांनी अत्यंत उत्कृष्ट रीतीने दिली.
शिबिराच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने नागरिक, महिला व युवकांनी सहभाग नोंदवला. फिटनेस योग अकॅडमीच्या या निःशुल्क उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हे शिबिर 24 जूनपर्यंत दररोज सकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत सुरू राहणार आहे.











