अखेर त्या शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले

बांदा (प्रतिनिधी) : महाविद्यालयीन युवतीला पळवून नेल्याप्रकरणी स्थानिकांनी बेदम चोप दिलेल्या त्या शिक्षकाला अखेर संस्थेने सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. तो शिक्षक शाळेत आल्यास आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नाही असा आक्रमक पवित्रा पालकांनी घेतला. अखेर संस्था समन्वय समिती सचिवानी तो शिक्षक पुन्हा शाळेत दिसणार नाही, अशी ग्वाही दिल्याने पालक व ग्रामस्थ शांत झाले.

बांदा परिसरातील एका माध्यमिक शाळेत ५५ वर्षीय शिक्षकाने परिसरातील गावातील विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी शाळेत घुसून त्या शिक्षकाला चोप दिला होता. त्यानंतर पोलीस स्थानकात अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. सदर युवतीने आपण शिक्षका सोबतच जाणार असल्याचे पोलिसांना सांगितले. युवती सज्ञान असल्याने पोलिसांनी जबाब लिहून घेत दोघांनाही सोडून दिले. युवतीच्या भूमिकेने सारेच अवाक झाले होते.

शनिवारी सकाळी पालक, ग्रामस्थ, संस्था पदाधिकारी यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. यावेळी पालकांनी आक्रमक भूमिका घेत त्या शिक्षकाची बदली करण्याची मागणी लावून धरली. तो शिक्षक शाळेत आल्यास आमची मुले शाळेत पाठवणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली. अखेर संस्था समन्वय समिती सचिव यांनी त्या शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याचे स्पष्ट केले. तो शिक्षक पुन्हा शाळेत दिसणार नाही अशी ग्वाही दिल्यानंतर पालक व ग्रामस्थ शांत झाले.

स्थानिक समन्वय पदाधिकारी यांनीही पालकांच्या भूमिकेला समर्थन दिले. अशा विकृत वृत्तीचे शिक्षक शाळेत नकोच अशी भूमिका घेतली. त्या शिक्षकाची तात्काळ बदली करण्यात येईल अशी ग्वाही समन्वय समिती सचिवानी दिली. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

error: Content is protected !!