चिंचवली मधलीवाडी जि. प. शाळा येथे शेर्पे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : शेर्पे केंद्र स्तरीय माहे मार्च २०२६ ची शिक्षण परिषद नुकतीच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधली येथे बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उद्घघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ सूर्यकांत भालेकर व उपस्थित मुख्याध्यापक श्रीपाद बागडी, सखाराम खरात व तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी चिंचवली मधली शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. तर या परिषदेत केंद्रप्रमुख संजय पवार यांनी उपस्थित शिक्षकांना शैक्षणिक व प्रशासकीय विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्र मुख्याध्यापिका वंशिका म्हाडेश्वर यांनी ‘निपुण महाराष्ट्र’ या महत्त्वपूर्ण विषयावर माहिती दिली व कुरंगवणे पश्चिम शाळेच्या उपशिक्षिका साक्षी राणे यांनी ‘SQAAF’ तर शिडवणे कोनेवाडी शाळेच्या उपशिक्षिका सीमा वरुणकर यांनी ‘PAT 3’ या विषयावर उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.

विशेष म्हणजे, ‘आपलो सिंधुदुर्ग’ या मोहिमेअंतर्गत आपली सर्व गावे विकिपीडियावर यावीत, या उद्देशाने शिडवणे नं. १ शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्वांना सविस्तर माहिती दिली. गावात काम करणाऱ्या शिक्षकांनी आपल्या गावाची विकिपीडियावर उपलब्ध नसलेली माहिती गोळा करून ठेवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याच परिषदेत केंद्रप्रमुख परीक्षेत निवड झाल्याबद्दल सुरेंद्र यादव यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन अजय गटकळ यांनी केले. या शिक्षण परिषदेला केंद्रातील सर्व शिक्षक आणि निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!