फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट महाविद्यालयातील संशोधन विभागाच्या वतीने “भाषा, साहित्य आणि सामाजिक शास्त्रांमधील संशोधनातील नैतिकता व प्रामाणिकता” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत संशोधन करताना नैतिक मूल्यांचे पालन, संशोधनातील प्रामाणिकता, पारदर्शकता आणि जबाबदारी यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेच्या प्रारंभी संशोधन विभागप्रमुख डॉ. सतीश कामत यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी उपस्थित प्राध्यापकवृंद, संशोधक विद्यार्थी आणि मान्यवरांचे स्वागत केले. पुढे बोलताना त्यांनी आजच्या ज्ञानयुगात संशोधन ही केवळ माहिती गोळा करण्याची प्रक्रिया नसून ती सत्यशोधनाची आणि समाजाला योग्य दिशा देणारी अत्यंत महत्त्वाची बौद्धिक प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले. विशेषतः भाषा, साहित्य आणि सामाजिक शास्त्रांच्या क्षेत्रात संशोधन करताना नैतिकता आणि प्रामाणिकता या मूल्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. संशोधनातून निर्माण होणारे ज्ञान समाजाच्या विचारप्रवाहावर आणि बौद्धिक विकासावर परिणाम करणारे असल्याने संशोधन प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी असणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेच्या प्रारंभी प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. संतोष राठोड यांचे स्वागत करून त्यांचा सविस्तर परिचय करून दिला. यानंतर प्रा. डॉ. संतोष राठोड यांनी संशोधनातील प्रामाणिकपणा, नैतिकता आणि मूल्यात्मकता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी संशोधनाचे समाजजीवनातील महत्त्व स्पष्ट करताना संशोधनामुळे विविध विषयांबद्दल नवे ज्ञान निर्माण होते आणि विद्यमान ज्ञान अधिक समृद्ध होते असे सांगितले. संशोधन ही समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच वैज्ञानिक समस्यांचे निराकरण शोधण्याची प्रभावी प्रक्रिया असल्याचे त्यांनी नमूद केले.
संशोधन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक आणि सर्जनशील विचारसरणी विकसित होते. त्यातून नवीन संकल्पना आणि सिद्धांत विकसित होतात. संशोधनातून मिळणारे निष्कर्ष समाजाच्या प्रगतीसाठी तसेच विविध धोरणांच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे विद्यापीठातील अध्यापन अधिक प्रभावी, दर्जेदार आणि अद्ययावत करण्यासाठी संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संशोधन करताना योग्य संदर्भ देणे, माहितीचे अचूक सादरीकरण करणे आणि नैतिक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आजच्या काळात संशोधन क्षेत्रात प्लेॅगेरिझम (Plagiarism), संदर्भ न देणे, माहितीचे चुकीचे सादरीकरण, तसेच संशोधनातील अनैतिक पद्धती या समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संशोधन करताना प्रामाणिकता, पारदर्शकता आणि जबाबदारी या मूल्यांचे काटेकोर पालन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रोफेसर डॉक्टर संतोष राठोड यांनी अधोरेखित केले. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेली ही कार्यशाळा संशोधकांना संशोधनातील नैतिक मूल्यांची जाणीव करून देणारी आणि त्यांना योग्य दिशा देणारी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नरे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांनी संशोधनाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे सांगितले. संशोधन ही समाजाला दिशा देणारी आणि समाजरचनेला आकार देणारी महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. त्यामुळे नवीन ज्ञानाचा सातत्याने शोध घेणे आणि ते ज्ञान मानवी समाजाच्या हितासाठी उपयोगात आणणे ही संशोधकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नमूद केले.
कार्यशाळेचे आभार प्रदर्शन संशोधन विभागाचे सहाय्यक डॉ. बाजीराव डफळे यांनी केले. तर या कार्यशाळेसाठी तंत्रसहाय्य प्रा. रूपाली पाटील, प्रा. संजय पाटील आणि अमित गोसावी यांनी केले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील सुमारे २२५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून लाभ घेतला, तर विविध ठिकाणांहून सुमारे ९८ संशोधक विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते. कार्यशाळेमुळे संशोधनातील नैतिकता, प्रामाणिकता आणि जबाबदारी यांविषयी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाल्याची भावना सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.












