वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसमोर केली बोगस कामाची पोलखोल
आचरा (प्रतिनिधी) : वायंगणी गावामध्ये सुरू असलेल्या भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पेटी बसवण्याचे बसवलेले बॉक्स निखळून पडत असल्याचे सरपंच रुपेश पाटकर व ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यांना जागेवर आणून दाखवत झालेल्या बोगस कामाची पोलखोल केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सदर कामामध्ये आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन केले जात नसून केबल टाकताना योग्य खोली राखली जात नाही. विद्युत वितरणसाठी बसवण्यात आलेले रस्त्यालागतचे बॉक्स योग्य काँक्रिट न घालता बसवल्याने निखळून पडत आहेत. तसेच खोदकामानंतर रस्त्यांची योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून भविष्यात अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या सुरू असलेल्या कामामध्ये निष्काळजीपणा दिसून येत आहे.
संबंधित कामाची तात्काळ पाहणी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून कामाची गुणवत्ता सुधारावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी ग्रामस्थ चंदू सावंत, रमाकांत नाईक आनंद कांबळी, सत्यवान सावंत गणेश धुळे, सचिन पेडणेकर, रितेश लाड, शुभम त्रिंबककर , सुनील त्रिंबककर , राजू पेडणेकर, गौरव पेडणेकर, संजय धुळे शामसुंदर नाईक व अन्य ग्रामस्थ हजर होते.












