देवगड (प्रतिनिधी) : पीएमसी योजनेअंतर्गत पीएमसी केंद्र शाळा शिरगाव नंबर एक येथे पर्यावरण जनजागृती कार्यक्रमांतर्गत ‘राखणदार’ हा निसर्ग प्रबोधन आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनुभव शिक्षा केंद्र सिंधुदुर्ग आणि राष्ट्रसेवा दल सिंधुदुर्ग यांच्या सहयोगाने तसेच कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांच्या संकल्पनेवर आधारित या जनजागृतीपर कार्यक्रमाद्वारे शालेय मुलांना मनोरंजनाच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती आणि निसर्ग संगोपणाविषयी माहिती देण्यात आली. यावेळी प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती तांबे, श्रीमती घाडगे, शिक्षक श्री. दळवी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती साटम त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होता.
श्रेयश शिंदे लिखित ‘राखणदार’ हे पथनाट्य श्रेयश शिंदे, सहदेव पाटकर आणि राहुल कांबळे यांनी सादर करून मुलांमध्ये मनोरंजक रीतीने पर्यावरण विषयी जनजागृती केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी मुलांनीही आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत निसर्ग संगोपनाची शपथ घेतली.















