चक्रीवादळाचा तडाखा : वैभववाडी तालुक्यातील अनेक गावात घरांचे मोठे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील आखवणे गुरववाडी, मौदे तसेच शिराळे या गावांना जोरदार चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून अनेक घरांचे व गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसासह आलेल्या या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उमळून पडली  आहेत. तर आंबा, काजू पिकाचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस व अचानक वाऱ्याचा वेग वाढत गेला आणि काही क्षणातच चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे व कौले उडून गेली, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचीही माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार शिराळे येथे किमान पाच घरांचे नुकसान झाले असून आखवणे गुरववाडी येथे श्री देवी धाकूबाई मंदिराचेही मोठे नुकसान झाले आहे.त्याच प्रमाणे काही घरे व गोठ्याचे नुकसान झाले आहे

शिराळे येथील मनोहर शेळके, बमू शेळके, हिरावती पाटील, विजय पाटील व अजित पाटील यांच्या घरांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अनेक कुटुंबांचे घरांचे छप्पर उडाल्याने त्यांना मोठा फटका बसला असून काही ठिकाणी घरातील साहित्यही पावसामुळे भिजून खराब झाले आहे.
चक्रीवादळ सायंकाळी उशिरा झाल्यामुळे सुरुवातीला नुकसानीचा अचूक अंदाज येऊ शकला नाही. मात्र रात्री उशिरापर्यंत आपत्कालीन कक्षामार्फत नुकसानीची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, या अवकाळी पावसामुळे काजू व आंबा  पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने मदत व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!