आज न्यायालयात करणार हजर
कणकवली (प्रतिनिधी) : शासकीय ठेकेदार तथा खाजगी बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी याच्या खूनाच्या गुन्ह्यात सुशांत दळवी यांचा मुकादम आरोपी अमर सत्यवान कदम याला कणकवली पोलिसांनी 27 मार्च रोजी रात्री 11 वाजता अटक केली आहे. आरोपी अमर याच्या अटकेबाबत त्याचा भाऊ लक्ष्मण कदम याला पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. ठेकेदार सुशांत दळवी यांचा मृतदेह कणकवली शहरातील कणकवली कनेडी रोडवर गणेशनगर भागात पाण्याच्या टाकीजवळ 27 मार्च रोजी सकाळी संशयास्पद स्थितीत आढळला होता. मयत सुशांतच्या डोक्यात दोन भुवयांच्या मधोमध जखम होती. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात बी एन एस 103 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज आधारे संशयित म्हणून अमर कदम याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानंतर रात्री 11 वाजता आरोपी अमर याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास एसपी डॉ. दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार डीवायएसपी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे करत आहेत. आरोपी अमर कदम याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.












