कणकवली (प्रतिनिधी) : आंबा आणि काजू बागायतदार उत्पादक शेतकऱ्यांची राज्य शासन मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी घोर फसवणूक केली असल्याची टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. आंबा काजू बागायतदारांच्या ओरोस येथील मोर्चावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळात याबाबत आवाज उठवून सरकारकडून मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही केले नाही. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही प्रतिकलम 220 रुपये एवढी तुटपुंजी आहे. औषध फवारणी, मजुरांची मजुरी हा खर्च अवाढव्य असतो. काढलेले कर्ज आणि त्याचा हफ्ताही या नुकसानभरपाईने फिटणार नाही. बारामतीच्या संस्थेला डीपीडीसीचे जे 4 कोटी दिले जाणार आहेत. एआय तंत्रज्ञान हवामानाला कसे नियंत्रित करणार ? असा सवाल करून या योजनेतून मलिदा खायचा असल्यामुळे पालकमंत्री ही योजना राबवणार असल्याचा आरोप उपरकर यांनी केला. काजू शेतकऱ्यांनाही राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. अवकाळी पडलेल्या पावसाने काजू जांभुलचे उरले सुरले पीकही जमीनदोस्त झाले आहे. राज्य सरकार आणि पालकमंत्र्यांच्या फसव्या घोषणांनी आंबा आणि काजू बागायतदारांची घोर फसवणूक झाली असून सरकार आणि पालकमंत्र्यांचा निषेध करत असल्याचे माजी आमदार उपरकर म्हणाले.
राज्य सरकार, पालकमंत्र्यांकडून आंबा काजू बागायतदारांची फसवणूक











