शिराळे येथे वादळी वारा व गारपिटीमुळे घरांचे नुकसान

पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी केली पाहणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिराळे गावात शुक्रवारी (दि. २७ मार्च) वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काही घरांचे नुकसान झाले. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेत अजित लाडकोजी पाटील यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून घरावरील कौले फुटली. तसेच हिरावती बाबाजी पाटील व मनोहर गंगाराम शेळके यांच्या घरावरील छप्पर कोसळून घरांचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. जिल्हा परिषद स्वनिधीतून “गरिबांची घरे दुरुस्ती” या योजनेअंतर्गत घरांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व सभापती सिद्धेश रावराणे यांच्या माध्यमातून शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे लोके यांनी सांगितले.

यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या समवेत तलाठी अक्षय लोणकर, सडुरे-शिराळे ग्रामपंचायत प्रशासक दीपक चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत जाधव, पोलीस पाटील महेंद्र शेळके तसेच कोतवाल मोहन जंगम आदी उपस्थित होते. यावेळी नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करण्यात आला.

error: Content is protected !!