उपवनसंरक्षक कार्यालयातील वृक्षतोडीवरून संताप; वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची गौरव मुळीक यांची मागणी

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या परिसरात झालेल्या वादग्रस्त वृक्षतोडीवरून आता रान पेटू लागले असून, या प्रकरणाची नेमकी वस्तुस्थिती काय आहे ती तातडीने स्पष्ट करा, अशी मागणी सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी केली आहे.
वनविभागाच्याच आवारात झालेल्या या झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत असून, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला उत्तर देणे कठीण झाल्याने मुळीक यांनी थेट उपवनसंरक्षकांना पत्र लिहून या प्रकरणाचा सविस्तर खुलासा मागवला आहे.

​या वृक्षतोडीबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांची दखल घेत, ही कारवाई कोणत्या नियमांतर्गत झाली आणि त्यामागील नेमके कारण काय, याची अधिकृत माहिती वनविभागाने तत्काळ द्यावी, असे मुळीक यांनी पत्रात नमूद केले आहे. वनविभागाच्या या भूमिकेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता अधिकारी यावर काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!