विजयदुर्ग रोरो बोट सेवा नियोजनाअभावी बंद; माजी आमदार उपरकर यांची टीका

डिझेलच्या वाढीव दराने पारंपरिक मच्छीमार हवालदिल; पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष

कणकवली (प्रतिनिधी) : विजयदुर्ग बंदरात होळीला सुरू केलेली रोरो बोट गुढीपाडव्याला बंद झाली आहे. सर्वसामान्य जनतेला न परवडणारे दर आहेत. मोठा गाजावाजा करत सुरू केलेली प्रिन्सेस फेरीबोट सेवा पालकमंत्र्यांच्या नियोजनाअभावी बंद पडल्याचा आरोप उबाठा शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. उपरकर पुढे म्हणाले की, रोरो बोटचे तिकीट दर सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाहीत. त्यातच विजयदुर्ग बंदरात उतरल्यानंतर पुढे वाहतुकीची कोणतीही सोय नाही. भाऊच्या धक्क्यावर प्रवासाआधी दीड तास हजर राहावे लागत आहे. मात्र ह्या दीड तासात प्रवाशांना साधे शौचालय सुविधा सुदधा तिथे नाही. रोरो बोट सुरू करताना प्रवासी खच्चून भरून आणले. पण आता गुढीपाडव्याला मुंबईला जाताना केवळ एकच प्रवासी गेला. रोरो बोट सुरू झाल्यानंतर सरासरी केवळ 50 प्रवासी प्रवास करत आहेत.

मच्छीमार संस्थांना 118 रु. दराने मिळणारे डिझेल आता 144 रुपये लिटर झाले आहे. शासनाकडून मिळणारा परतावा सोडला तरीही 26 रुपये मच्छीमार संस्थांना ज्यादा भरावे लागत आहेत. हा भुर्दंड पारंपरिक मच्छीमाराना सोसावा लागत आहे. त्याचा फायदा एलईडी पर्ससीन वाले उठवत आहेत. डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे ऐन मासेमारी हंगामात पुढील 3 महिने मासेमारी बंद ठेवावी लागेल अशी भीती मच्छीमारानी व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांकडे मत्स्य खाते असूनही जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांकडे पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष झाले असल्याची टीका उपरकर यांनी केली.

error: Content is protected !!