वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी वैभववाडी आयोजित निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान अर्थात’ सिंधू नायक केसरी ‘ ही स्पर्धा शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मैदान वैभववाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. या सिंधू नायक केसरी स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.अशी माहिती भारतीय जनता पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे यांनी दिली आहे.
वैभववाडी येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत साठे बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे, व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत, प्रकाश पाटील,आदित्य चव्हाण, संतोष पवार, शिवाजी राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भालचंद्र साठे पुढे म्हणाले, सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कुस्त्यांचे मैदान पाहायला मिळणार आहे. या कुस्ती स्पर्धेचे खास आकर्षण उपमहाराष्ट्र केसरी तथा भारत केसरी पैलवान प्रकाश बनकर व ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान अमित कुमार (दिल्ली )हे असणार आहेत. या कुस्तीसाठी रोख १ लाख ७५ हजार ५७५ बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर कुस्त्यांसाठीही मोठी बक्षिसे करण्यात आले आहेत. जवळपास पुरुषांच्या ३५ व महिलांच्या ५ कुस्त्या होणार आहेत. प्रत्येक कुस्तीसाठी प्रायोजक ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी कर्नाटक,दिल्ली,मध्यप्रदेश असे देशभरातून नामवंत ७० पैलवान वैभववाडी येत आहेत. पुरुषांबरोबरच दहा महिला पैलवान या कुस्ती स्पर्धेत भाग घेणार आहेत. त्याचबरोबर विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे. क्रीडा रसिकांनी या कुस्त्यांच्या जंगी सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन साठे यांनी केले.











