कणकवली खरेदी विक्री संघाच्या वतीने खरीब हंगाम बैठक; तालुक्यातील सर्व सोसायटीने खत विक्रीसाठी परवाना काढण्याच्या सूचना
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका खरेदी विक्री संघ हा नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. त्यामुळे खत कंपन्यांनी दरवर्षीप्रमाणेच वेळेत खत पुरवठा करावा. युद्धजन्य परिस्थितीमुळे खत तुटवडा निर्माण झाल्यास आता रोख स्वरुपात खत खरेदी सोसायटीना करावी लागणार आहे. आर्थिक भार पडत असेल त्यांनी जिल्हा बँकेकडे कर्ज आवश्यक असल्यास प्रस्ताव तातडीने करावेत. शासनाने युरियावरील सवलत कमी करावी, त्यामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. त्याऐवजी सुफला खतावर अनुदान वाढवावे. खत कंपन्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन बँक संचालक विठ्ठल देसाई यांनी केले.
वागदे येथील हॉटेल विश्रांती येथे कणकवली खरेदी विक्री संघ संघाच्या वतीने खरीप हंगाम बैठकीत ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, उपाध्यक्ष सुरेश ढवळ, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक सुशांत भोसले, जिल्हा मोहीम अधिकारी राहुल माने, तालुका गुणवत्ता निरीक्षक कणकवली स्वप्नील भांदिगरे, तालुका गुणवत्ता निरीक्षक वैभववाडी राजन सावंत, आरसीएफ मार्केटिंग मॅनेजर राजे शिर्के, महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ विभागीय व्यवस्थापक श्री. काळे, वसंत ॲग्रोचे संभाजी देसाई, परादीप फॉस्फेटचे श्री. वर्दम, पांडुरंग ॲग्रोचे श्री. वरक, संचालक गणेश तांबे, रघुनाथ राणे, गुरुप्रसाद वायंगणकर, अतुल दळवी, मिथील सावंत, प्रशांत सावंत, संजय शिरसाट, संघाचे व्यवस्थापक डी.आर.परब, माजी व्यवस्थापक गणेश तावडे, माजी व्यवस्थापक श्री. घाडीगावकर व विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, सचिव व संघाचे कर्मचारी उपस्थित होते.
चेअरमन प्रकाश सावंत म्हणाले, सोसायटी मध्ये खत विक्री साठी खत परवाना आवश्यक असल्याने दरवर्षी चर्चा होते. मात्र, सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. आम्ही सोसायटीना पत्रव्यवहार केला तरी देखील परवाना होत नाही. लायसन्स नसेल तर खत मिळणार नाही. आता दोन महिन्यात ही लायसन्स काढावीत, अन्यथा शेतकऱ्यांना अडचण होणार आहे. त्या त्या सचिवाने लक्ष घालावा, तरच प्रश्न मार्गी लागेल.
या सभेमध्ये विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. वेळेत खत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. सूत्र संचालन, प्रास्ताविक संघाचे व्यवस्थापक डी. आर. परब तर आभार प्रदर्शन संघाचे संचालक गणेश तांबे यांनी मानले.












