आय. पी. एस. तुषार पाटील यांचे निधन

सिंधुदुर्गात अप्पर पोलीस अधीक्षकपदी बजावली होती सेवा

पुणे (प्रतिनिधी) : राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) गट-५, दौंडचे समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील (वय ४५) यांचे रविवारी ६ जून रोजी उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. दोन दिवसांपूर्वी रक्ताची उलटी झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते कोमात गेले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

तुषार पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षकपदी सेवा बजावली होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांची एसआरपीएफ गट-५, दौंड येथे समादेशकपदी नियुक्ती झाली होती. कोल्हापुरात जिल्हा परिषदेजवळील एका अपार्टमेंटमध्ये त्यांचे वास्तव्य होते.

आठ वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना किडनी दान केली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारली होती आणि ते नियमितपणे सेवेत कार्यरत होते.

सोमवारी सकाळी नऊ वाजता जळगाव जिल्ह्यातील जामनेर या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी शिल्पा नाईक, मुलगा संकेत आणि एक भाऊ असा परिवार आहे.

error: Content is protected !!