वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात रविवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे वैभववाडी-सडूरे मार्गावरील निमअरुळे येथे रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली. या घटनेमुळे या मार्गावरील वाहनांची रांग लागली होती. मात्र एसटी बसमधील प्रवासी, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांच्या तत्परतेमुळे झाड बाजूला करण्यात आले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून रविवारी दुपारनंतर अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली. या वादळी वाऱ्यांमुळे निमअरुळे येथे रस्त्यावर झाड कोसळले. त्यामुळे वैभववाडी-सडूरे या महत्त्वाच्या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद झाली.
दरम्यान, वैभववाडीहून सडूरेकडे जाणारी दुपारची एसटी बसही या ठिकाणी अडकून पडली. बसमधील प्रवाशांना पुढे जाणे शक्य नसल्याने त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवासी, ग्रामस्थ आणि काही वाहनचालकांनी एकत्र येत रस्त्यावर पडलेले झाड तोडण्याचे व बाजूला करण्याचे काम हाती घेतले. सुमारे तासभराच्या प्रयत्नांनंतर झाडाचा अडथळा दूर करण्यात यश आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. मान्सूनच्या आगमनानंतर तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. वादळी वाऱ्यांमुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि वाहनचालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.












