कणकवली (प्रतिनिधी) : केवळ १२ वर्षांचा असलेला मंथन पराग उकरडे याने ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक या खेळप्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले आहे. दुसऱ्या आशियाई ट्रॅम्पोलिन स्पर्धेच्या निवड चाचणीत तो सहभागी झाला होता. ही निवड चाचणी १८ व १९ एप्रिल २०२६ रोजी चेन्नई येथील हॉल ऑफ जिम्नॅस्टिकमध्ये पार पडली. या स्पर्धेत देशभरातून अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये मंथनने आपल्या उत्कृष्ट कौशल्याने लक्ष वेधून घेतले व प्रथम स्थान पटकावले. यापुढे चायना येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई जिम्नॅस्टिक ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तो सहभागी होणार आहे. मंथन हा कलमठ गावचे सुपुत्र पराग उकरडे यांचा चिरंजीव असून कणकवली, कनक नगर येथील रहिवाशी माजी शिक्षिका रश्मी हर्णे यांचा नातू आहे. लहान वयातच खेळाप्रती असलेली त्याची आवड, मेहनत आणि चिकाटी यामुळे त्याने ही यशाची पायरी गाठली आहे. त्याच्या या यशासाठी त्याचे अकॅडमी अजय क्लब चे सर्वेसर्वा अजय म्हापूसकर व त्याचे प्रशिक्षक शुभम तांबे यांनी अथक परिश्रम केले आहेत. त्याच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांकडून त्याचे कौतुक होत असून भविष्यात तो आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
तरुण खेळाडूची चमकदार कामगिरी : मंथन उकरडेची ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिकमध्ये झेप












